सर्वसामान्य ग्राहक, किरकोळ विक्रेत्यांपुढे प्रश्न; शेतकरी संपामुळे भाज्यांचा तुटवडा होण्याची भीती

कृषी कर्जमाफी, रास्त हमीभाव आदी मागण्यांसाठी गुरुवारपासून शेतकरी संपावर गेल्याचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसईतील बाजारांत जाणवला नाही. आदल्या दिवशी मुंबईकडे येण्यास निघालेल्या भाजीपाल्याच्या गाडय़ा कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच घाऊक बाजारांत पोहोचल्यामुळे गुरुवारी भाज्याची आवक नेहमीप्रमाणे होती; परंतु शेतकऱ्यांचा संप सुरूच राहिल्यास शुक्रवारपासून शहरांत भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या भीतीपोटीच गुरुवारी सर्वच ठिकाणच्या भाजीबाजारांत ग्राहकांनी गर्दी करून पुढील काही दिवसांसाठी भाजीखरेदी केली. परिणामी मुंबईतील दादर, भायखळा या मुख्य भाजी बाजारांसह ठाण्यातील किरकोळ बाजारांत भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचा संप कायम राहिल्यास येत्या एक-दोन दिवसांत भाज्या दुपटीने महाग होण्याची शक्यता किरकोळ विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

कर्जमाफी, कृषीमालास हमीभाव, सातबारावरील बोजा कमी करणे, बिनव्याजी कर्जपुरवठा अशा विविध मागण्यांवर राज्य सरकारशी झालेली चर्चा अयशस्वी ठरल्याने अखेर नाशिक, पुणे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी मध्यरात्रीनंतर राज्यात काही ठिकाणी भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाडय़ा रोखून धरण्याच्या तसेच भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याच्या घटना घडल्या; परंतु याचा फारसा परिणाम मुंबई, ठाण्यातील किरकोळ भाजी बाजारांवर गुरुवारी दिसला नाही.

दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील भाजी बाजारात शुक्रवारी दुपारी छोटय़ा भाजी विक्रेत्यांची गर्दी दिसून आली. शेतकऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारपासून भाज्यांची आवक होणार नसल्याने मुंबई परिसरातील अनेक छोटे भाजी विक्रेते काकडी, भेंडी, फ्लॉवर, वाटाणा, वांगी यांसारख्या एक दिवस टिकतील अशा भाज्या शुक्रवारसाठी साठवून ठेवत होते. गुरुवारी दुपार पर्यंत कांदे, बटाटे, कोथिंबीर, पालक या भाज्याचे ट्रक दादरच्या भाजी बाजारात दिसत होते. या बाजारात कोथिंबीर जुडी २० रुपयांनी विकली जात होती. मात्र किरकोळ बाजार ही कोथिंबीरीची जुडी ४० ते ४५ रुपयांपर्यंत विकली जात होती. याशिवाय ऐरवी ६० ते ७० रुपये किलोने मिळणारा वाटाणा दादरच्या बाजारात ८० रुपये किलोने विकला जात होता. क्रॉफर्ड मार्केटमध्येही काही भाज्यांमध्ये ५ ते १० रुपयांनी वाढ केली होती. तर संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भाज्यांच्या किमतीत दुपटीने वाढ होईल, असे त्या बाजारातील पांडुरंग पवार यांनी सांगितले.

भाजी विक्रेत्यांकडे बुधवारचा काही माल शिल्लक आहे. त्याशिवाय गुरुवारी भाज्यांची आवक झाली होती. हा माल शुक्रवापर्यंत पुरेल. मात्र खरी भाज्यांची टंचाई शनिवारपासून जाणवेल. यादरम्यान किरकोळ विक्रेते भाज्यांच्या किमती दुपटीने वाढवतील, असे भायखळा बाजारातील भाजी विक्रेते पोपटराव नाईकडे यांनी सांगितले.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी नेहमीच्या तुलनेत जास्त, ९६ गाडय़ांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी दिली. त्यामुळे शहरांना भाज्यांचा पुरवठा करणे शक्य झाले. दुसरीकडे, किरकोळ बाजारांत गुरुवारी भाजी मंडईत ग्राहकांची गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. शेतकरी संपादरम्यान सुरू झालेली तोडफोड व भाजीपाल्याच्या गाडय़ा अडवण्याचे प्रकार यांमुळे शुक्रवारपासून भाज्यांचा तुटवडा होण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी भाजी खरेदी करण्यात आली.

दुधाची आवकही घटली

संपावर गेलेल्या शेतकऱ्यांनी शहराचा कृषिमाल व दूधपुरवठा रोखण्याचे जाहीर केले आहे. त्याचा परिणाम दूध कंपन्यांनाही सहन करावा लागत आहे. गुरुवारी महानंद दूध कंपनीकडे ४० टक्के दुधाची आवक कमी झाली आहे. दर दिवसाला महानंद कंपनीकडून २ लाख ६० हजार लिटर दुधाची निर्यात मुंबई, नागपूर, पुणे, वैभववाडी येथे केली जाते. संपाच्या पाश्र्वभूमीवर दोन दिवस पुरेल  इतका साठा करून ठेवण्यात आला आहे, असे महानंद कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.