मंत्रालयात पोलिसांशी बाचाबाची घडल्यानंतर औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानुसार मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवून भुसारे यांना अटक केली. दंडाधिकारी न्यायालयाने त्यांची पाच हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका केली. न्यायालयात त्यांच्या पत्नी व कुटुंबीय उपस्थित होते.

गुरुवारी सकाळी विरोधी पक्षाचे आमदार, विधिमंडळ सदस्य मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात धडकले. यावेळी भुसारे कुठे आहेत, असा प्रश्न सदस्यांनी केला. तेव्हा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमधील संवादाच्या अभावामुळे भुसारे यांना न्यायालयात नेले, असे उत्तर पुढे आले. प्रत्यक्षात भुसारे तेव्हा पोलीस ठाण्यातच होते. हे उत्तर ऐकून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भुसारे यांना मोबाइल वर फोन केला. तो भुसारेंनी उचलला. ते पोलीस ठाण्यातच आहेत हे समजताच सदस्य आक्रमक झाले. त्यावेळेस भुसारे यांना का लपवताय असा प्रश्न उपस्थित झाला.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर आम्हाला भुसारेंना लपवायचेच असते तर पोलीस ठाण्यात का ठेवले असते. त्यांचा फोन त्यांच्या जवळच का ठेवू दिला असता? उलट बुधवारी ते प्रचंड आक्रमक होते, नुकसान भरपाई तरी द्या किंवा आत्महत्येची परवानगी तरी द्या, ही त्यांची मागणी होती. तसेच पोलीस वाहनात (वायरलेस) त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत त्यांना मोकळे सोडणे उचित वाटले नाही. आम्ही त्याना अटक जरूर केली. पण आरोपी सारखी किंवा सराईत गुन्हेगारासारखी वागणूक अजिबात दिली नाही. त्यांचे कुटुंबिय कुठवर पोचले हे जाणून घेण्यासाठी आम्ही सतत संपर्कात होतो. स्वत भुसारेही संपर्क करत होते. कुटुंबीय येताच भुसारे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जमीन मंजूर केला. तिथून त्यांना कुटुंबियांच्या हवाली केले. जामिनावर सुतल्यानंतर भुसारे यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटिल यांची त्यांच्या शासकीय निवास स्थानी भेट घेतल्याचे समजते.

गुरुवारी भुसारे मंत्रालयात पांडुरंग फुंडकर, सदाभाऊ खोत यांना भेटले. मात्र सहाव्या मजल्यावर येताच ते आक्रमक झाले. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. खाली आणताना ते पोलीस हवालदार शंकर पाटणकर यांना चावले. पाटणकर यांनी हात झटकला तेव्हा भुसारे यांच्या दात व ओठातून रक्त आले. त्यानंतर वायरलेस पोलीस वॅनमध्ये भुसारे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली. वायरलेस पोलीस वॅनमध्ये वाहतूक नियमनासाठी किंवा घटनेनंतर एखादा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी रश्शी असते. भुसारे या रश्शीने गळफास घेण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. पुढे पोलीस ठाण्यात आणून, गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली, असे शर्मा यांनी सांगितले. भुसारे यांची जी. टी. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी घेण्यात आली.