मंत्रालयासमोर भाजीपाला फेक आंदोलन!

शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट मुंबई- ठाण्यात विकण्याची मुभा राज्य सरकारने दिली. मात्र आता शहरातही या शेतकऱ्यांना नागवले जात असून जागोजागी थेट भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना पालिका अधिकारी आणि स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडून हप्त्यांसाठी धमकावले जात आहे. त्यामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी आज मंत्रालयासमोर भाजीपाला फेकून असंतोषाला वाट करून दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा राज्य सरकार करीत असले तरी आजच्या घटनेमुळे सरकारचे शेतकरी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

व्यापारी आणि दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतमाल थेट शहरात आणून विकण्याची परवानगी देणारा निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला. एवढेच  नव्हे तर शहरातील लोकांना किफायशीर किंमतीत भाजीपाला मिळावा आणि शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा यासाठी मुंबई- ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये आठवडी बाजारही सुरू करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट शहरात आणून विकण्याची मुभा देण्यात आली. त्यासाठी पोलिस किंवा महापालिकेच्या कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसून कोणी त्रासही देणार नाही अशी घोषणा सरकारने केली होती. सरकारची ही योजना शेतकरी आणि ग्रहकांसाठीही फायदेशीर ठरू लागली असून ग्रामीण भागातील अनेक शेतकरी थेट शहरांमध्ये भाजीपाला विकू लागले आहेत. मात्र आता या शेतकऱ्यांना हप्त्यांसाठी सतावले जात आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात आठवडी बाजार भरवण्यास पालिका अधिकारी अटकाव करीत असल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम- परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी  आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख उमेश नायकिंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या दारात भाजीपाला फेकून आंदोलन केले. कांदा, वांगी, बटाटा, मिरच्या, लिंबू मंत्रालयाच्या दारात फेकून आंदोलक शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

परराज्यातून आलेल्या परप्रांतियांना महापालिकेचे अधिकारी मुंबईत कुठेही भाजीपाला विक्रीसाठी बसू देतात. त्याचवेळी भूमीपूत्र शेतकऱ्यांना मात्र वारंवार नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला. पैसे दिले नाही तर तुरूंगात  डांबण्याची धमकीही दिली जाते. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागण्यास गेल्यास तेही दाद देत नसून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पोट कसे भरायचे असा सवालही या शेतकऱ्यांनी केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या या दडपशाहीचा खासदार राजू शेट्टी यांनी निषेध केला असून सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.