राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता सरकारच्या तिजोरीतून आणखी दोन हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश दोनच दिवसात निघणार आहे.
  दरम्यान टंचाई निवारणासाठी राज्य सरकारने केंद्राकडे साडेचार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली असली, तरी राज्याला अद्याप एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे आज, शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे होणाऱ्या बैठकीत राज्याला नेमकी किती मदत मिळते, याकडे सरकारचे लक्ष लागले आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सरकारने केंद्राकडे साडेचार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. केंद्राच्या पथकानेही राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी करून अहवाल दिला असून, केंद्राच्या निकषात बसणारी मागणी असल्याने किमान चार हजार कोटी रुपये तरी मिळावेत, अशी राज्याची अपेक्षा आहे. मात्र राज्याला नेमकी किती मदत मिळेल, याबाबत साशंकता असल्याचे सूत्रांनी सांगितले.