27 February 2021

News Flash

शेतमाल थेट गृहनिर्माण संस्थांमध्ये

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरकरांना माफक दराचा लाभ

|| संजय बापट

सरकारची योजना; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरकरांना माफक दराचा लाभ

शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील दरी दूर करणाऱ्या आठवडी बाजार योजनेस मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आता कृषी उत्पादने आणि दुग्धजन्य पदार्थ थेट मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांतील लोकांना माफक दरात घरपोच पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकरी संस्था, महिला बचत गट किंवा गृहनिर्माण संस्थांना सोसायटीच्या आवारात विक्री केंद्रे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २०० सोसायटय़ांमध्ये लवकरच ही योजना सुरू होत आहे.

‘अटल महापणन विकास अभियाना’अंतर्गत राज्यातील कृषी उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारणे, मालाला रास्त भाव मिळावा तसेच शहरी भागातील लोकांनाही माफक दरात जीवनावश्यक शेतमाल आणि दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ मिळावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठय़ा शहरांमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना रास्त दरात चांगल्या प्रतीचा भाजीपाला किंवा शेतमाल तसेच दुग्धजन्य पदार्थ पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात विक्री केंद्रे उभारण्यास सरकारने अनुमती दिली आहे.

पालिका आणि पोलिसांनाही ही योजना राबविण्याबाबत आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. यात कोठेही दलाल किंवा मध्यस्थांचा हस्तक्षेप होणार नाही. पुण्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून २०० गृहनिर्माण सोसायटय़ांनी प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या संस्थाही पुढे आल्या आहेत. लवकरच योजना सुरू होईल.

योजनेचे स्वरूप

सोसायटीच्या आवारात १०० चौरस फूट जागेत हे केंद्र सोसायटीला सुरू करता येईल किंवा ते बचत गट, शेतकरी संस्थांना नाममात्र भाडे किंवा मोफत देता येईल. शेतमाल किंवा फळे, दुग्धजन्य पदार्थाची मागणी संबंधित शेतकरी संस्थांकडे नोंदवून त्या वस्तू माफक दरात लोकांना देता येतील. सोसायटी आणि उत्पादक संस्था यांच्यात करार होणार असून जिल्हा उपनिबंधकावर त्याची जबाबदारी असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 1:20 am

Web Title: farming commodities direct in housing society
Next Stories
1 वैद्यकीय शिक्षण संचालनालयही वाळवीने पोखरले!
2 केंद्राच्या पॅकेजमुळे साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’
3 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी डिसेंबरपासून
Just Now!
X