मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात फारूख टकला हा सक्रिय होता व तो दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार होता. त्याने खोटी ओळखपत्रे दाखवून मुश्ताक महंमद मियॉ या नावाने २०११ मध्ये पासपोर्ट मिळवला, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. दुबईच्या भारतीय  दूतावासाने त्याला पासपोर्ट जारी केला होता व फारूख टकला हा पकडला गेल्यानंतर जप्त करण्यात आला होता. फारूख टकला याला ८ मार्च २०१८ रोजी भारतात आणले गेले, तेव्हा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला अटक करण्यात आली होती.

सीबीआयने गेल्या आठवडय़ात टाडा न्यायालयात दाखल  केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे, की महंमद फारूख यासिन मन्सूर ऊर्फ फारूख टकला हा मार्च १९९३ मधील बॉम्बस्फोटानंतर दुबईला पळाला होता. मुंबईतील त्या बॉम्बस्फोटात २५७ लोक ठार झाले होते.  तो मुश्ताक महंमद मिया नावाने दुबईत राहत होता. त्याच्याकडून दुबईच्या भारतीय दूतावासाने दिलेला पासपोर्ट ८ फेब्रुवारी २०११ रोजी जप्त करण्यात आला होता. १९ नोव्हेंबर १९९३ रोजी मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. ४ नोव्हेंबर १९९३ रोजी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात टकला हा आरोपी क्रमांक १९६ होता व ४४ फरारी गुन्हेगारांपैकी तो एक होता.

टकला हा दुबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने त्याच्यावर गेल्या ऑगस्टमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. टकला हा दाऊद इब्राहिम व अनिस इब्राहिम या दोघांचा साथीदार असून १९९३ च्या बॉम्बस्फोटात त्याने मोठी भूमिका पार पाडली होती. तो शेख बुरहान स्ट्रीट येथे राहत होता व त्याने आरोपींची राहण्याची व नंतर दुबई मार्गे पाकिस्तानला जाण्याची व्यवस्था केली होती. नंतर त्या आरोपींना शस्त्रप्रशिक्षण पाकिस्तानात देण्यात आले व मुंबईत हल्ला झाला होता. आरोपपत्रात म्हटले आहे, की त्याने दुबईत सलीम बिस्मिल्ला खान ऊर्फ सलीम कुर्ला (मरण पावलेला आहे) व इतर चार जण – महंमद हनीफ महंमद उस्मान शेख, शेख अब्राहम शेख हुसेन, उस्मान खान, महंमद सयीद इशाक यांचे दुबईत जंगी स्वागत केले होते.