उन्हाळा वाढतो आहे.. कलाप्रदर्शनं तर पाहायची आहेत, पण बसनं किंवा पायी फिरण्याचा त्रास होतो आहे.. अशा वेळी मुंबईतल्या दोन संग्रहालयांचा आसरा जरूर घ्यावा! ही दोन संग्रहालयं आहेत अशी की, जिथं किमान एखादा तासभर कसा गेला कळत नाही.. आणि मुख्य म्हणजे इथं नुसत्या ‘पुराणवस्तू’च नव्हे तर हल्लीची कलाप्रदर्शनंसुद्धा पाहायला मिळतात!
पहिला मान अर्थातच, दक्षिण मुंबईच्या मुख्य चौकांपैकी ‘श्यामाप्रसाद मुखर्जी चौका’तल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा (याचंच आधीचं नाव ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम). इथलं तिकीट ७० रुपये प्रत्येकी इतकं असलं, तरी एक अख्खी दुपार इथं अगदी सहज निघून जाईल आणि ज्ञानात भर पडतच राहील. मोहेंजोदडो-हरप्पा संस्कृतीपासून ‘परळची शिवमूर्ती’सारख्या सातवाहनकाळापासून ते अगदी १९व्या शतकातल्या हस्तिदंतापर्यंतच्या मूर्ती इथे आहेत.. एकाच कुटुंबानं कुठूनकुठून जमवलेल्या तपकिरीच्या छानछोकी चिनी बाटल्या, काच आणि ‘क्रिस्टल’ची अनेकानेक भांडी अशी एकेक दालनं उलगडतात.. छत्रपती शिवरायांचं ‘सर्वाधिक विश्वसनीय’ चित्रही याच संग्रहालयात आहे.. नाण्यांचं निराळं, भारतीय वस्त्रांचा इतिहास आणि भूगोलही मांडणारं निराळं, शिवाय कार्ल खंडालावाला यांनी जमवलेल्या वस्तूंचं आणखी निराळं अशी दालनं नव्या पाखेत आहेत आणि ‘भागवत गोष्टी’सारखी वर्षभर चालणारी प्रदर्शनंही आहेत! याच पाखेतल्या दालनांच्या मागच्या जिन्यावरनं ‘जहांगीर निकल्सन आर्ट फाऊंडेशनच्या चित्रसंग्रहा’च्या खास दालनाकडे जाता येतं! हे जहांगीर निकल्सन अकोल्यात जन्मलेले, (मराठी छान बोलणारे) पारशी व्यापारी कुटुंबातले चाळिशीपासून स्वतचा चित्रसंग्रह वाढवणारे होते. सन २००१ मध्ये त्यांच्या निधनानंतर, काही काळानं त्यांचा अख्खा संग्रह या म्युझियमकडे (निराळं दालन असण्याच्या अटीसह) आला. वैशिष्टय़ हे की, इथं समकालीन कलेची प्रदर्शनं भरतात!
सध्या या खास दालनात, ‘द जर्नी इज द डेस्टिनेशन’ हे प्रदर्शन आहे, त्यात सुधीर पटवर्धन, नलिनी मलानी, अतुल दोडिया, अंजू दोडिया, सुनील गावडे, बैजू पार्थन, विवान सुंदरम आणि झरिना हाश्मी अशा चित्रकारांची २० वर्षांपूर्वीची चित्रं आणि आत्ताची कामं पाहायला मिळतील. विशेषत गावडे आणि सुंदरम हे त्या वेळी चित्रं काढायचे आणि आता मांडणशिल्पं करतात, त्यामुळे त्यांची चित्रं होती कशी हे तरुण कलाविद्यार्थ्यांना पाहता येईल. हे प्रदर्शन ऑगस्टपर्यंत चालणार आहे, त्यामुळे त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
दुसरं संग्रहालय म्हणजे राणीच्या बागेतलं, मुंबई महापालिकेच्या मालकीचं ‘भाऊ दाजी लाड म्युझियम’. मुंबईबद्दलची भरपूर माहिती या संग्रहालयात मिळतेच. शिवाय आता तर तीन-तीन खास प्रदर्शनं सुरू आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीचा जुना काळ मांडणारं जे. एच. ठक्कर यांनी टिपलेल्या फोटोंचं प्रदर्शन वरच्या मजल्यावर आहे.. नलिनी जयवंत किंवा लीला चिटणीस, कामिनी कौशल यांच्या तरुणपणातल्या फोटोंपासून तरुणपणीच अमिताभ बच्चन किंवा माधुरी दीक्षितही इथं पाहाता येतील. इथून मागल्या दारानं बाहेर पडून जरा डाव्या हाताला गेलात, तर ‘स्पेशल एक्झिबिशन स्पेस’मध्ये (भिंतीविनाच) मार्टिन रोमर यांची छायाचित्रं आहेत. याबद्दल गेल्याच आठवडय़ात याच स्तंभात लिहिलं गेलंय.
याच संग्रहालयात मागच्या बाजूला असणाऱ्या दोन बैठय़ा दालनांमध्ये, ‘एक्स्पेरिमेंट्स- बंगालचे पाच उत्तराधुनिक दृश्यकलावंत’ हे प्रदर्शन भरलं आहे. श्रेयसी चॅटर्जी, सुमित्रो बसक, संगीता मैती, किंशुक सरकार आणि पीतांबर खान यांची कामं इथं आहेत. यापैकी श्रेयसी यांनी बंगालच्या ‘कांथा’ भरतकामापासून पुढे जाऊन, जणू सहज ड्रॉइंग केल्यागत धाग्यांचा वापर करून कापडावर तसंच कॅनव्हासवरही चित्रं केली आहेत. काही चित्रांत रंगकाम आहे, पण अनेकदा रंगांचे मोठे भाग (पॅच) हे कापडाचाच तुकडा लावून ‘अ‍ॅप्लिक’च्या तंत्रानं साकारले आहेत. सुमित्रो, पीतांबर यांची चित्रं बडोद्यापासून कोलकात्यापर्यंत अनेक आर्ट स्कुलांतले विद्यार्थी जसं काम करतात, त्यापेक्षा फार निराळी वाटत नाहीत. अर्थात, तीनचार कलाकृतींत या दोघांचा आवाका कळणेही अवघड आहे. संगीता मैती यांनी धातूच्या पत्र्याचा वापर विविध प्रकारे केला आहे. कधी आकार कापून त्याचा ड्रॉइंगसारखा वापर, कधी धातूवर फोटो-ट्रान्स्फर तर कधी धातूवर सेरिग्राफी (स्क्रीन प्रिंटिंग) अशा कामांतून, दृश्यवैविध्याला तंत्रवैविध्याची जोड देण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवतो. किंशुक सरकार यांची चित्रं ही अस्वस्थ करणारी सामाजिक अवस्था टिपणारी आहेत.
एकदाच तिकीट काढून तीन-चार दालनांत विनासायास हिंडण्याची सोय असणारी ही संग्रहालयं उन्हाळय़ात उत्तमच.