व्हिवा लाउंजमध्ये उद्या फॅशन डिझायनर वैशाली एस.; फॅशन डिझायनिंगमधील आव्हानांचाही वेध

अस्सल देशी वस्त्रांना ‘फॅशन शो’चे ग्लॅमर मिळवून देत फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या डिझायनर वैशाली एस. यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी येत्या बुधवारी (दि. १०) ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने मिळणार आहे. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेमक्या कुठल्या कौशल्यांची आवश्यकता असते, या क्षेत्रात करिअरच्या किती आणि कशा प्रकारच्या संधी आहेत, आव्हाने कोणती हे त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांमधून उलगडेल. फॅशनविश्वातील वातावरण, त्याबाबतचे समज-गैरसमज यावरही प्रकाश पडू शकेल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.
वैशाली एस. हा ब्रॅण्ड देशातील प्रमुख ‘फॅशन वीक’मधील एक महत्त्वाचे नाव झाला आहे. भारतीय परंपरेतील वस्त्रांना आधुनिक शैलीतील कलात्मक रूप देणारी डिझायनर म्हणून वैशाली यांची वैशिष्टय़पूर्ण ओळख फॅशनविश्वात निर्माण झाली आहे. पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या कलात्मकतेशी नाते सांगतानाच वैशाली एस. हा ब्रॅण्ड जागतिक फॅशनमधल्या आधुनिकतेला आपलेसे करतो. वैशाली एस. विविध राज्यांतील हातमाग कारागिरांसोबत काम करून त्यांना फॅशनचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत आहेत. पैठणी, चंदेरी अशा पारंपरिक वस्त्रांना आधुनिक रूप देत त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले.
वैशाली शडांगुळे मध्य प्रदेशातील विदिशामध्ये वाढलेली एक मराठमोळी मुलगी. काही तरी वेगळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अठराव्या वर्षी घराबाहेर पडते, शहरात येते आणि कोणतीही पाश्र्वभूमी नसताना फॅशनविश्वातील चकाकत्या दुनियेचा एक भाग होते. वैशाली एस. हा स्वत:च्या नावाचा ब्रॅण्ड निर्माण करते आणि त्याची ओळख देश-विदेशात पसरवते. वैशाली यांची ही प्रेरणादायी कथाही व्हिवा लाउंजमध्ये उलगडेल.

कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई.
कधी : बुधवार, दिनांक १० फेब्रुवारी
वेळ : सायंकाळी ४.४५ वाजता