जयेश सामंत / ऋषीकेश मुळे, ठाणे

मुंबई परिसरातील पथकर (टोल) नाक्यांवर १ जानेवारीपूर्वी ‘फास्टॅग’ यंत्रणा बसविण्याचे आदेश राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे या पथकर नाक्यांवरील प्रवास कोंडीमुक्त होणार आहे.

देशभरातील पथकर नाक्यांवरील प्रवास कोंडीमुक्त व्हावा आणि येथील आर्थिक कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारी २०१८ पासून ‘फास्टॅग’ ही ‘डेबिट टोल’ यंत्रणा बसविणे बंधनकारक केले. मात्र, बऱ्याच राज्यांत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे केंद्राकडून ‘फास्टॅग’ यंत्रणा बसविण्यासाठी १५ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने १ जानेवारीपूर्वी मुंबई परिसरातील पथकर नाक्यांवर ‘फास्टॅग’ यंत्रणा बसविण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. ही यंत्रणा सज्ज होताच दोन महिन्यांत मुंबई परिसरातील पथकर नाक्यांवर ‘फास्टॅग’नुसार वसुली होणार आहे. असे असले तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेली १५ डिसेंबरची मुदत मात्र हुकणार आहे.

केंद्र सरकारच्या मूळ योजनेनुसार १ जानेवारी २०१८ नंतर नवे वाहन खरेदी करताना ग्राहकांकडून ‘फास्टॅग’ स्टिकरसाठी किमान ६०० रुपयांची आकारणी केली जाते. ग्राहकांनी असे स्टिकर खरेदी केले आहे का, ते तपासूनच परिवहन विभागाकडून वाहनांची नोंदणी केली जाते. हा फास्टॅग स्टिकर म्हणजे एक प्रकारचे डेबिट टोल कार्ड आहे. वाहनावरील या स्टिकरच्या माध्यमातून पथकर नाक्यावर नोंद होऊन संबंधित वाहनचालकाच्या बँॅक खात्यातून रक्कम थेट पथकर व्यवस्थापनाच्या खात्यात वळती होईल, अशी ही योजना आहे. टोलनाक्यांवर इंधनाची आणि वेळेची बचत व्हावी यासाठी आखण्यात आली आहे.

बारामती आणि औरंगाबादमध्येही अंमलबजावणी

फास्टॅग योजना केवळ राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांनाच लागू राहणार असल्यामुळे आमचा या योजनेशी संबंध नाही, अशी भूमिका मुंबई परिसरात पथकर नाका चालविणाऱ्या व्यवस्थापनाने घेतली होती. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई परिसरातील वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर या महत्त्वाच्या टोल नाक्यांवरही ‘फास्टॅग’चा नवा नियम लागू राहणार असल्याचे पत्र पाठविले आहे. या पत्रासोबत संबंधित पथकर नाकाचालकांनी १ जानेवारीपूर्वी पथकर नाक्यांवर फास्टॅगसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर पूर्णपणे ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी १ जानेवारीची तारीख अपेक्षित असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोलवसुली विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. भारत बस्तेवाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यांसोबत बारामती आणि औरंगाबाद येथील टोलनाक्यांवरही ही यंत्रणा लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

१५ डिसेंबरपासून मुंबई-पुणे महामार्गावर..

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर, तळेगाव, वर्सोली आणि देहूरोड या महत्त्वाच्या चार पथकर नाक्यांवर १५ डिसेंबरपासून फास्टॅग योजना कार्यान्वित राहणार आहे.

अशी असेल फास्टॅग यंत्रणा / असा मिळवाल फास्टॅग

देशभरातील विविध टोलनाक्यांसह दररोज लाखो प्रवासी प्रवास करणाऱ्या मुंबईच्या वेशींवरील टोलनाक्यांवर रोकडविरहित आणि झटपट प्रवास करण्यासाठी ही फास्टॅग यंत्रणा अमलात आणण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फास्टॅग स्टिकर्स नसलेल्या जुन्या वाहनांना स्टिकर्स लावून घ्यावे लागणार आहेत. फास्टॅग स्टिकर्स हे विविध राष्ट्रीय आणि खासगी बँकांसह इतर ठिकाणांहून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांवरही फास्टॅगचे स्टिकर उपलब्ध असणार आहेत. पथकर नाक्यांवर फास्टॅग असलेले वाहन आल्यास फास्टॅग यंत्रणा वाहनावरील फास्टॅग स्टिकर आपोआप स्कॅन करेल आणि कोणत्याही अडथळ्याविना वाहनाला वेगाने टोलनाक्यावरून प्रवास करता येईल.

मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यांनाही फास्टॅग योजना अमलात आणायची असून त्यासाठी तातडीने आवश्यक यंत्रणा बसविण्याचे आदेश संबंधित पथकर नाकाचालकांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ही यंत्रणा मुंबई परिसरातील टोलनाक्यांवर १ जानेवारीपासून पूर्णपणे कार्यान्वित होईल.

डॉ. भारत बस्तेवाड, महाव्यवस्थापक, राज्य रस्ते विकास महामंडळ टोलवसुली विभाग