News Flash

तासन्तास उपाशीपोटी रुग्णसेवेचे व्रत

सर्व सहन करून डॉक्टरमंडळी रुग्णसेवेचे व्रत कसोशीने पाळत आहेत.

संग्रहित छायाचित्र

रसिका मुळ्ये

करोनाविरोधातील लढाईत डॉक्टरांची युद्धपातळीवरील मोहीम; ‘पीपीई’ पोषाख परिधान करून वस्त्यावस्त्यांमधून नमूने संकलन

संरक्षक पोशाख घातल्यावर अंगाची लाही होत असते, कामाचे पाच-सहा तास पाणीही पिता येत नाही आणि कधी कधी त्यातही रुग्णांचा असहकार अशा परिस्थितीतही संशयित रुग्णांचे नमुने घेणाऱ्या डॉक्टरांचे काम सध्या सुरू आहे. कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉक्टरांना कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र, हे सर्व सहन करून डॉक्टरमंडळी रुग्णसेवेचे व्रत कसोशीने पाळत आहेत.

टाळेबंदीमध्ये घरातील सर्व सदस्य एकत्र आल्याच्या, संवाद वाढल्याचा अनुभव घरोघरी अनेकांना येतो आहे. मात्र, त्याचवेळी स्वत:च्या जिवावर उदार होऊन, घरादारापासून दुरावा पत्करून डॉक्टर्स सध्या करोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. संशयित रुग्णांच्या चाचण्या घेणे, त्यांची पडताळणी, त्यांच्यावर उपचार या सगळ्याचा ताण वाढत्या रुग्णसंख्येबरोबर वाढत आहे. चाचण्यांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. अनेक भागांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे, तेथे डॉक्टर त्या भागांत फिरून संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेत आहेत. तासन्तास पाण्याचा घोटही न घेता, वेळप्रसंगी जेवणही बाजूला ठेवून डॉक्टर, परिचारिका रुग्णसेवा करत आहेत.

डॉ. जयंत सरगर हे शीव रुग्णालयाने चाचण्या घेण्यासाठी तयार केलेल्या पथकात कार्यरत आहेत. ज्या भागांत संशयित रुग्ण अधिक आहेत असे भाग चाचणी करणाऱ्या पथकांना नेमून दिले जातात. दिलेल्या भागांत जाऊन रुग्णांची चाचणी करण्याचे काम डॉ. सरगर करतात. त्यांची पत्नीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर आहे. ‘आम्ही मुले सुरक्षित राहावीत यासाठी त्यांना त्यांच्या आजी-आजोबांकडे पाठवून दिले आहे. दोघेही सायंकाळी घरी आलो की एकाच घरात दोन स्वतंत्र घरे असल्यासारखे वागतो. दोघेही रुग्णांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेतो. दिवसभरात ५५ ते ६० संशयित रुग्णांचे नमुने घेतले जातात. त्यासाठी दिलेला संरक्षक पोशाख एकदा घातला की तो सतत काढ-घाल करता येत नाही. प्लास्टिकच्या त्या पोशाखात झळा बसत असतात. पाच-सहा तास पोशाख घातलेला असेपर्यंत पाणीही पिता येत नाही,’ असा अनुभव डॉ. सरगर यांनी व्यक्त केला.

‘आम्हालाही आमच्या कुटुंबाची काळजी असते, परंतु त्यांच्यापासून दूर राहावे लागते. काहीवेळा चाचण्या करण्यासाठी ज्या भागांत जातो तेथील रुग्णांची मानसिकता नसते. त्यांचे काही गैरसमज असतात, भीती असते. त्यामुळे त्यांच्याकडून असहकार असतो. अनेक ठिकाणी स्थानिक रुग्णालयांमध्ये स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतलेली नसल्याचेही पाहायला मिळाले,’ असा अनुभव अन्य एका डॉक्टरांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:42 am

Web Title: fasting for hourly for patient care abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 काळजी घ्या! मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या २ हजारांच्या जवळ
2 प्रश्न तुमचा, उत्तर महापालिका आयुक्तांचं; लोकसत्ताच्या व्यासपीठावर
3 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी गच्चीवर मुलांसोबत खेळतोय कॅरम
Just Now!
X