राज्यातील खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अन्य राज्यांच्या धर्तीवर अनुदान मिळावे या तंत्रशिक्षण खात्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व खासगी आय.टी.आय. कर्मचारी व राज्य शिक्षणसंस्था महामंडळ यांच्यावतीने ५ डिसेंबरला आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अशासकीय आय. टी. आय. प्राचार्य व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गुजरात व कर्नाटकबरोबरच अन्य काही राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांना वेतन अनुदान द्यावे ही मागणी १९९४ पासून केली जात आहे. मात्र, यावर सकारात्मक भूमिका घेऊन त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. खासगी आय.टी.आय. ला अनुदान देण्यात आल्यास ३० हजार विद्यार्थ्यांना कमी शुल्कात आय. टी.आय. प्रशिक्षण घेता येईल, असे बोरस्ते यांनी सांगितले. ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविण्यासाठी खासगी संस्थाचा आधार घेत गुणवत्ता टिकविण्यासाठी अन्य राज्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतनासाठी आर्थिक मदत शासनाने करावे, असे आवाहन विजय नवल पाटील केले आहे.