सतत शाळा बुडविल्याच्या कारणास्तव वडिलांचा रोष ओढवून घेणाऱ्या आणि नंतर तो असह्य झाल्याने चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाने गेल्या वर्षी फिनाईल पिऊन आत्महत्या केली होती. मात्र काठी आणि पट्टय़ाने बेदम मारहाण करून त्याचा अतोनात छळ करणाऱ्या आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पित्याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे मुलाच्या आत्महत्येप्रकरणी पित्याला दोषी ठरविल्याची ही दुर्मीळ घटना आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी हा निकाल दिला. दिवान सिंग (४०) या सिलिंडर पुरवठय़ाचे काम करणाऱ्या पित्याला न्यायालयाने ११ वर्षांच्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरविले. शिस्तीला फाटा देत शाळा बुडविणाऱ्या मुलाला सिंग हा सतत मारहाण करीत होता आणि त्यामुळे मुलाने नैराशाच्या गर्तेत जाऊन आत्महत्या केल्याचा पुरावा पुढे आल्यानेच त्याला ही शिक्षा देण्यात आली, असे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे.
२००७ मध्ये सिंग याची पत्नी त्याला सोडून निघून गेली. सोबत ती मुलीलाही घेऊन गेली. तेव्हापासून सिंग हा आपल्या मुलासह ओशिवरा येथील आदर्शनगरमध्ये राहत होता. मुलाला त्याने ‘ओरिएण्टल स्कूल’मध्ये दाखल केले होते. गेल्या वर्षी १३ जुलै रोजी सिंग कामावरून घरी परतला त्या वेळेस मुलगा न्हाणीघरात बेशुद्धावस्थेत पडला असल्याचे त्याला आढळून आले. त्याने तात्काळ त्याला नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलाने फिनाईल प्राशन केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. याशिवाय त्याच्या शरीरावर आणि डोक्यावर मारहाणीच्या खुणाही आढळून आल्या होत्या़