|| शफी पठाण

संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा परखड सवाल

संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : विद्यापीठात शिकणाऱ्या आमच्या मुलांच्या डोक्यावर दंडुके पडत असताना गप्प कसे बसायचे? आम्ही त्याचा विरोध करू. प्रखर विरोध करू, तुम्हाला आमचे जे करायचे आहे ते करा, पण आम्ही ते बोलत राहू, अशा प्रखर शब्दांत ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी वर्तमानातील दडपशाहीच्या राजकारणावर टीका केली.

उस्मानाबाद येथे सुरू झालेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून फादर दिब्रिटो बोलत होते. प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. या वेळी संमेलनाध्यक्ष दिब्रिटो म्हणाले, कुणाच्या ताटात काय आहे, यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आज सर्रास गाईच्या नावाने माणसांचे गळे चिरले जात आहेत; परंतु स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी गाईविषयी केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. त्यामुळे आज गाईंच्या नावाने होणाऱ्या हत्या हा सावरकरांचा वैचारिक पराभव आहे. राजकारण ही समाजातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून साहित्यिक या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही.

या वेळी मंचावर माजी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, माजी संमेलनाध्यक्ष सर्वश्री नागनाथ कोतापल्ले, डॉ. अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या माजी प्रभारी अध्यक्ष माधवी भट, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळमुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन उपस्थित होते. या संमेलनाच्या स्वागत सत्रातील विशेष बाब म्हणजे संमेलनाला ऐन वेळी आलेले राज्याचे सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख स्वत:हून प्रेक्षकांमध्ये बसले.

‘मी आलोय, हे महानोरांचे  भूत नाही’

मी संमेलनात आलोय. जी व्यक्ती बोलतेय ती महानोरांचे भूत नाही, अशा शब्दांत संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांनी त्यांना संमेलनास येऊ नये म्हणून धमकावणाऱ्यांना सुनावले. साहित्यिकाला जात नसते. मराठी साहित्यविश्वाला उदारतेचा मोठा इतिहास असताना ख्रिस्ती समाजाच्या माणसाला संमेलनाचा अध्यक्ष का केले, असे कुणी विचारत असेल तर ती त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. साहित्य जातीच्या पलीकडे कसे असते ते पाहायचे असेल तर रेव्हरंड नारायण वामन टिळकांचे कार्य आम्ही पाहिले पाहिजे. हे तेच रेव्हरंड, ज्यांना नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद निर्विवाद देण्यात आले होते. याचे कारण त्यांची खासगी मते आणि त्यांचे समाजहिताचे कार्य या दोन वेगळ्या गोष्टी होत्या. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल आगामी शंभराव्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत. ते मुस्लीम आहेत. या माझ्या मराठवाडय़ातील मायभूमीचे शाहीर अमर शेख मुस्लीम होते. केवळ महाराष्ट्राने नव्हे, तर देशाने त्यांना डोक्यावर घेतले. असे डोक्यावर घेताना त्यांची जात कधी आडवी आली नाही, याकडेही त्यांनी  पोटतिडिकीने लक्ष वेधले. राजकारण्यांना साहित्याचे व्यासपीठ पूर्णपणे वज्र्य करावे का, यावरही महानोर यांनी टिप्पणी केली. हा वाद मुळातच चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाणांनी कराड, इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात कमीपणा स्वीकारून आणि  साहित्यिकांना पहिला मान देऊन ते प्रेक्षकांमध्ये बसले. राममनोहर लोहिया, अटलबिहारी वाजपेयी हे हाडाचे साहित्यिक होते. त्यांना केवळ राजकारणी म्हणून कसे डावलता येईल, असा सवालही महानोर यांनी केला. दाभोलकर, कलबुर्गीची हत्या झाल्यानंतर त्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना संशयाच्या नजरेने पाहिले जाते, हे दुर्दैवी आहे. आज वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांना रोजगार हमीवरील मजुरांपेक्षा कमी पैसे मिळतात. अशा स्थितीत वाचनसंस्कृती कशी टिकून राहणार, असा प्रश्नही महानोरांनी उपस्थित केला.

कवयित्री अनुराधा पाटील यांचा विशेष सत्कार

उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणाऱ्या कवयित्री अनुराधा पाटील यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष नितीन तायडे यांनी केले. कौतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन झाले.

ग्रंथदिंडीत साहित्याचा जागर : संमेलनाच्या प्रारंभी सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष नितीन तायडे सहभागी झाले होते. या दिंडीत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. जनजागृती फलकांद्वारे पर्यावरण, आरोग्याचा संदेश देण्यात येत होता.

..म्हणून पुढाऱ्यांचे अभिनंदन

प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र व्यासपीठ असते. उस्मानाबादेतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय राजकारणी मंडळींनी मोठय़ा मनाने घेतला आहे. हा एक नवीन पायंडा या संमेलनातून पाडला जात आहे. त्याबद्दल पुढाऱ्यांचे आणि उस्मानाबादकरांचे अभिनंदन, अशा शब्दांत फादर दिब्रिटो यांनी अमित देशमुख यांचे कौतुक केले.

मी पुन्हा येईन! : या संमेलनाच्या निमित्ताने मी आता मराठवाडय़ाचा मानसपुत्र झालो आहे. येथील लोकांनी मला स्वीकारले आहे. केवळ हे एकच संमेलन नाही, यानंतरही मी येथे पुन्हा येईन, अशी ग्वाही संमेलनाध्यक्षांनी दिली. त्यांच्या पुन्हा येईन, या वक्तव्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

झेंडे खांद्यावर घेणे हा विचारीपणा नव्हे – ढेरे

विशिष्ट विचारांनी भारलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमाला शरण जाणे जसे खेदजनक आहे तसेच शहाण्या, सुसंस्कृत वाङ्मयप्रेमींचा विचार न करता संमेलनाच्या संदर्भात निर्माण केलेल्या अराजकसदृश परिस्थितीला दरवेळी सामोरे जाणेही खेदजनक आहे. हे किंवा ते झेंडे खांद्यावर घेणे म्हणजे आपण विचारी आहोत, असे सिद्ध करणे नव्हे. तो खरा विवेकवादीही नव्हे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी नवीन संमेलनाध्यक्षांकडे संमेलनाची सूत्रे सोपवताना व्यक्त केले. संमेलनाच्या उद्घाटनाला परभाषेतील साहित्यिकाला बोलावण्याचा संकेत या संमेलनात पाळला गेला नाही, त्याबद्दलही ढेरे यांनी खंत व्यक्त केली.

जेव्हा लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही अवतरते तेव्हा साहित्यिकांनी स्पष्टपणे बोलले पाहिजे. अशा वेळी मौन बाळगणे हा भेकडपणा आहे.  – फादर फ्रान्सिस दिब्रिटो