वैद्यकीय प्रशिक्षणाचा आपत्कालीन प्रसंगात उपयोग

श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या ४६ दिवसांच्या बाळाला भाईंदरहून परळच्या वाडिया रुग्णालयात घेऊन जात असताना वडिलांनी प्रसंगावधान राखत तोंडाने श्वासोच्छवास दिल्याने रूग्णालयापर्यंत बाळ सुखरूप पोहोचू शकले. रुग्णालयात बाळावर आता उपचार सुरू आहेत.

प्रियम या ४५ दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला रुग्णवाहिकेतून भाईंदरहून परळ येथील वाडिया रुग्णालयात आणले जात होते. त्यावेळी बाळासोबत त्याचे आईवडिलही होते. प्रवासादरम्यान बाळाला श्वास घेण्यास फारच त्रास होऊ लागला. त्याची तगमग बघून वडिल गुड्डू चौधरी यांनी बाळाला सीपीआर म्हणजेच तोंडाने श्वासोच्छवास दिला. त्यामुळे बाळ रुग्णालयापर्यंत सुखरुप पोहोचू शकले.

प्रियमला वारंवार ताप येत होता. त्याला उपचारांसाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात येत होते. पण विविध प्रकारच्या चाचण्या, औषधे आणि उपचारांनीही त्याचा ताप उतरत नव्हता. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती. त्यामुळे पालकांनी प्रियमला बी जे वाडिया रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

वाडिया रुग्णालयात आणल्यावर त्याला ताबडतोब बालअतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटर लावून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. इकोकार्डिओग्राफीमध्ये त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूला मोठी गाठ असल्याचे स्पष्ट झाले, असे वाडिया रुग्णालयातील बाल हृदयरोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले.

विविध शाखांच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यावर ह्रदयाची झडप उघडून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हृदयातील गोळ्यामुळे रक्तपुरवठा नीट होत नव्हता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याच्या हृदयातील गाठ (टय़ूमर) काढण्यात आला. प्रियमचे वडिल यांनी प्रसंगावधान राखून त्याला श्वासोच्छवास दिल्याने त्याचा जीव वाचविणे शक्य झाल्याचे वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. प्रियमच्या वडिलांना कामाच्या ठिकाणी मिळालेल्या वैद्यकीय प्रशिक्षणाचा या करिता उपयोग झाला.