लोकलच्या दारातील प्रवाशांना धोका; वर्षभरात मध्य रेल्वेवर ९५ तर पश्चिम रेल्वेवर ८७ घटना

लोकलच्या दारात उभे असताना रुळांलगतच्या खांबावर चढून बसलेल्या चोरटय़ाने मारलेल्या फटक्यामुळे तोल जाऊन रुळांवर पडल्याने कल्याणमधील द्रविता सिंग या तरुणीला पाय गमवावा लागल्याच्या घटनेने उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांमध्ये ‘फटका गँग’ची मोठी दहशत निर्माण झाली आहे. लोकलच्या दारावरील बेसावध प्रवाशाच्या हातावर फटका मारून त्याच्याकडील मोबाइल व अन्य साहित्य लुटून नेणारी ‘फटका गँग’ मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे स्थानकांच्या हद्दीत कार्यरत आहे. गतवर्षी अशा चोरटय़ांनी लुटल्याच्या ९५ घटनांची मध्य रेल्वे पोलिसांकडे नोंदही झाली आहे. मात्र, आतापर्यंत यातील केवळ २० गुन्ह्य़ांचा तपास लावण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, या ‘फटका गँग’चा बीमोड करण्याऐवजी प्रवाशांनाच सतर्क राहण्याचे आवाहन करण्याची मागणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

कल्याणमध्ये राहणारी द्रविता सिंग ही तरुणी बुधवारी लोकलने सीएसएमटीकडे जात असताना सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ रुळाजवळील खांबाआड दडून बसलेल्या चोरटय़ाने बांबूने द्रविताच्या डोक्यावर फटका मारला. त्यामुळे तोल जाऊन द्रविता खाली पडली. त्याच वेळी विरुद्ध  दिशेने आलेल्या लोकलने तिला धडक दिली. या दुर्घटनेत तिला एका हाताची बोटे व एक पाय गमवावा लागला. द्रविता रक्तबंबाळ अवस्थेत पडली असताना या चोरटय़ाने तिच्या हातातील १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल घेऊन पळ काढला. या घटनेतील आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी नंतर अटक केली; परंतु लोकलच्या दारात उभ्या राहिलेल्या प्रवाशांना अशा प्रकारे लुटणाऱ्या टोळीचा उपद्रव वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेवरील वडाळा, कोपरखैरणे, ऐरोली, रबाळे, कल्याण, कोपर, सॅन्डहर्स्ट रोड स्थानक, डोंबिवली, ठाणे, नाहूर, कोपरी ब्रिज, तर पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते माहिम, विलेपार्ले ते अंधेरी, ग्रॅन्ट रोड ते मरिन लाइन्स या ठिकाणी फटका गँगचा वावर अधिक आहे. गतवर्षी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ९५ गुन्ह्य़ांची नोंद झाली. यातील ७९ प्रकरणांत प्रवाशांचा मोबाइल, पाकीट, चैन लुबाडण्यात आले, तर १६ प्रकरणांत फटक्यामुळे प्रवाशाला जबर इजा झाल्याने या गुन्ह्य़ांची दरोडा म्हणून नोंद करण्यात आली आहे; परंतु आतापर्यंत यातील केवळ २० गुन्ह्य़ांतील आरोपींना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. पश्चिम रेल्वेवर अशा प्रकारचे ८७ गुन्हे घडल्याची नोंद आहे. अशा चोरटय़ांविरोधात कडक कारवाई मोहीम हाती घेण्याऐवजी ‘आरपीएफ’ने प्रवाशांनाच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ‘‘प्रवाशांनी दरवाजाजवळ उभे राहू नये. मोबाइल, पर्स, पाकीट यांची काळजी घ्यावी, अशा स्वरूपाच्या उद्घोषणा चालवण्याची विनंती मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येईल,’ असे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.

गुन्ह्य़ाची पद्धत

  • लोकल गाडीतून प्रवास करताना दरवाजाजवळ उभे असलेले अनेक प्रवासी मोबाइलवर बोलत असतात.
  • त्यांना हेरून रुळांच्या बाजूलाच किंवा सिग्नल तसेच विद्युत खांबांजवळच उभ्या असणाऱ्या चोरटय़ांकडून दंडुका किंवा लोखंडी वस्तूने प्रवाशाच्या हातावर जोरदार फटका मारला जातो.
  • त्यामुळे प्रवाशाच्या हातून मोबाइल पडताच चोरटय़ाकडून तो लंपास केला जातो.
  • अनेकदा अचानक लागलेल्या फटक्यामुळे बेसावध प्रवाशाचा तोल जाऊन धावत्या गाडीतून खाली पडून ते जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.

फटका मारून प्रवाशांना लुटण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. आमच्याकडून कठोर कारवाई केली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे मार्गावर सहजतेने प्रवेश करणारे अनधिकृत प्रवेशद्वार मोठय़ा प्रमाणात आहेत. ते बंद केल्यास बरेच प्रश्न सुटतील. त्यामुळे अनधिकृत प्रवेशद्वार लवकरात लवकर बंद करण्याची मागणीही आम्ही केली आहे.

निकेत कौशिक, लोहमार्ग पोलीस आयुक्त