विधान परिषदेत गुटखाबंदीचा विषय मांडला म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन दमबाजी करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन खात्यामधील अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. आकरूपे यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली. या प्रश्नावरून विधान परिषदेत विरोधी पक्षाचे सदस्य कमालीचे आक्रमक झाल्यामुळे दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. अखेर आकरूपे यांच्या निलंबनाची घोषणा केल्यानंतर कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले.

धनंजय मुंडे यांनी गेल्या आठवडय़ात राज्यातील गुटखाबंदीचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. याप्रकरणी खात्याचे अधिकारी व गुटखा तस्कर यांचे संबंध असल्याने सीआयडी चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली होती. मुंडे यांच्या या मागणीनंतर आर. डी. आकरूपे व भाजपच्या एका आमदाराने मुंडे यांच्या कार्यालयात गुरुवारी येऊन तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. आज याबाबतचा विषय सभागृहात उपस्थित करून सरकारला विरोधी पक्षाचा आवाज बंद करायचा आहे का, असा सवाल मुंडे यांनी केला.