औद्योगिक वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचा प्रस्ताव

आइस्क्रीमची दुकाने, पदपथावरील बर्फगोळ्याच्या गाडय़ा व सरबतांच्या टपऱ्यांवर वापरला जाणारा बर्फ खाण्यास योग्य आहे की नाही हे आता लवकरच ओळखता येणार आहे.

रस्त्यांवरील किंवा पदपथावरील सरबते व बर्फाचे गोळे तयार करणाऱ्या गाडय़ांवरील निकृष्ट बर्फाच्या सेवनामुळे नागरिकांना पोटांच्या आजाराची लागण होते. यामुळे दर वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) दूषित बर्फाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.

यामध्ये हजारो किलोचा दूषित बर्फ नष्ट केला जातो. अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याबाबत होणारी हेळसांड थांबविण्यासाठी एफडीएने पावले उचलली आहेत.

दूषित बर्फामध्ये आढळणारा ई-कोलाय विषाणू आरोग्यास घातक असून काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या पाहणीत फेरीवाल्यांकडील ९५ टक्के बर्फ दूषित असल्याचे समोर आले होते. यातील ७५ टक्के नमुन्यांमध्ये ई-कोलाय विषाणू आढळून आले होते.

या ई-कोलायमुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, कावीळ, विषमज्वर या आजारांची लागण होते. त्यामुळे नागरिकांनी बाहेर तयार केलेले थंड पदार्थ खाताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन एफडीए व पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जाते. ८ ते १२ मे दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एफडीएने ७२ हजार किमतीचा दूषित बर्फ नष्ट केल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कंपन्यांचाही पाठिंबा

एफडीएने बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या व राज्यातील अन्न व औषध प्रशासनांच्या प्रमुखांसोबत घेतलेल्या बैठकीत अखाद्य किंवा औद्योगिक बर्फाला निळा रंग देण्याचा ठराव केला आहे. या वेळी बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांनीही एफडीएच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. दोन दिवसांपूर्वी या बैठकीत अखाद्य बर्फाला निळा रंग देण्याचे निश्चित करण्यात आले. हा निळा रंग हानीकारक रसायनविरहित असणार आहे. याबाबतचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यात आले असून लवकरच अखाद्य बर्फाचा रंग बदलण्यात येईल, असे एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले. मुंबईत बर्फाचे उत्पादन करणाऱ्या नऊ, तर नवी मुंबईत पाच कंपन्या आहेत. यापैकी अनेक कंपन्यांमध्ये खाण्यास योग्य व औद्योगिक वापराचा बर्फ अशा दोन्ही प्रकारच्या बर्फाचे उत्पादन केले जाते. औद्योगिक बर्फाचा वापर रासायनिक कंपन्या, औषध उद्योग, मत्स्य व्यवसाय येथे केला जातो.