पेडर रोडजवळ खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अहवालाची प्रतीक्षा

मुंबई : मुंबईतील मलबार हिल येथून पेडर रोडला जाणाऱ्या बी. जी. खेर मार्गावरील डोंगराचा भाग भुसभुशीत झाला असून मुसळधार पाऊस पडल्यास त्यावरून दरड कोसळण्याची भीती तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे.

संरक्षक भिंत खचल्यामुळे वाताहत झालेला बी. जी. खेर मार्ग आणि एन. एस. पाटकर मार्गाच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे बुधवारी रात्री मलबार हिल येथील कमला नेहरू पार्क येथून पेडर रोडच्या दिशेला जाणारा बी. जी. खेर मार्ग आणि बाबुलनाथ येथून पेडर रोडला जाणाऱ्या एन. एस. पाटकर मार्गादरम्यान असलेली संरक्षक भिंत हळूहळू खचली. त्यामुळे बी. जी. खेर मार्गाची  वाताहत झाली असून संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोसळलेली संरक्षक भिंत आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आयआयटीचे तज्ज्ञ आणि अन्य दोन तज्ज्ञांचे मत घेण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे येथील डोंगरावरून दरड कोसळण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली असून पालिकेने हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले आहेत.

आठ दिवसांनी पुन्हा एकदा तज्ज्ञ मंडळी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर एन. एस. पाटकर मार्ग वाहतुकीसाठी खुला करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञांनी अहवाल सादर केल्यानंतर बी. जी. खेर मार्ग आणि संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे पालिकेच्या रस्ते विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

पावसाने पेडर रोडजवळ असलेली बी. जी. खेर मार्गावरील संरक्षक भिंत बुधवारी ढासळली. या भिंतीबरोबरच रस्ताही खचला आहे. (छाया-गणेश शिर्सेकर)