राज्यभरात विशेषकरून मुंबईत करोनाच्या मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(मंगळवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. “मुंबईसह राज्यात कमी होत असलेल्या चाचण्या, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी, संसर्ग वाढण्याचा धोका, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अपडेट न होणे, त्यातून नेमकी माहिती कोरोना लढ्यासाठी उपलब्ध न होणे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.” अशी फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, “गेल्यावर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा कमी संख्येने चाचण्या केल्या जात असल्याबद्दल मी संपूर्ण आकडेवारीसह सातत्याने आपणाशी पत्रव्यवहार केला होता. आज दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे, हे माझे कर्तव्य समजतो. मुंबईत गेल्या आठ दिवसांत झालेल्या चाचण्यांच्या संख्येकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.” यासोबतच फडणवीसांनी तारखेनुसार चाचण्यांची संख्या दर्शवली आहे. आठ दिवसांतील मुंबईतील चाचण्यांची सरासरी येते, ४० हजार ७६० चाचण्या प्रतिदिन असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

तसेच, “नागपूर जिल्ह्यात सुद्धा अवघ्या ४० लाख लोकसंख्येत याच आठ दिवसांची सरासरी काढली तरी २६,७९२ चाचण्या प्रतिदिन होत आहेत. ६८ लाखांच्या पुण्यात देखील सरासरी २२ हजार चाचण्या प्रतिदिन होत आहेत. असे असताना या शहारांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४० हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून करोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल.” असं देखील फडणीस म्हणाले आहेत.

याचबरोबर “आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांचाही प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले आहे. राज्याचा संसर्ग दर २५ ते २७ टक्क्यांच्या आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही.” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

तर विशेष उल्लेख करून मुबंईबाबत बोलताना फडणवीस म्हणतात “मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची गरज आहे. कारण, मुंबईतून संक्रमित लोक हे गावी गेले आहेत. मागील लाटेत त्यांचे ट्रॅकिंग व ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचे प्रमाम वाढते आहे. मुंबईची मृत्यूसंख्या सुद्धा सातत्याने दडविण्याचे काम होत आहे. रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अत्यंसंस्कार होणारे मृतदेह व रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांत देखील आहे. राज्यातील एकूण करोना बळींच्या संख्येत एकट्या मुंबईत २० टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही.”