करोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही. आता पाश्चात्य देशांसह दिल्ली, अहमदाबाद आदी विविध ठिकाणी करोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून, करोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रविवारी दिला. मात्र, तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली, अहमदाबादमधील वाढता करोना आणि राज्यातील करोना रुग्णसंख्येत दिवाळीनंतर झालेली वाढ या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री आठ वाजता समाजमाध्यमांवरील थेट प्रक्षेपणामार्फ त राज्यातील जनतेशी संवाद साधला. गेले आठ महिने जनतेने सहकार्य केले. नियमांचे पालन केले. सर्व धर्मीयांनी सणही साधेपणाने साजरे केले. या संयमाला व सहकार्याला तोड नाही, असे कौतुक ठाकरे यांनी केले.

मात्र, दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी गर्दी झाली, याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी अनेक लोक मुखपट्टी न वापरता फिरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.  प्रामुख्याने तरुण मंडळी खबरदारी न घेता बाहेर फिरत असून त्यांना बाधा होत आहे. त्यांच्यामुळे घरातील वयोवृद्धांना करोनाची लागण होऊ शकते. करोना नियंत्रणापासून आता पुन्हा लाटेची शक्यता अशा वळणावर आपण उभे आहोत. या धोकादायक वळणावर असताना हालचालींवर नियंत्रण हवे,असे ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या आठ महिन्यांपासून सतत काम करत असून त्यांच्यावरील ताण वाढू नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी शिस्त पाळून घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

अनेक जण हे उघडा ते उघडा, अशा मागण्या करत असतात. हे केवळ राजकारण आहे. पण त्यातून करोना वाढला तर ही मंडळी जबाबदारी घेणार का, असा सवाल करत नाव न घेता त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. राज्यातील जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. त्या दृष्टीने जे करायचे ते सर्व महाविकास आघाडी सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

राज्यातील पुण्यासह विविध शहरांत दिवाळीच्या काळात उसळलेल्या प्रचंड गर्दीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गर्दीत चेंगरून करोना मेला की काय, असे उपरोधिक विधान के ल्याचा संदर्भही मुख्यमंत्र्यांनी दिला. गर्दी करणे टाळायलाच हवे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अद्याप लस आलेली नाही. डिसेंबर, जानेवारी किंवा त्यानंतर कधीतरी येईल, असे सांगितले जात आहे. पण, त्या लशीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. राज्यातील साडेबारा कोटी लोकसंख्येचा विचार करता एकू ण २५ कोटी डोस लागतील. त्यासाठी किती कालावधी लागेल याचाही विचार करून करोनाची लागणच होणार नाही याची काळजी घ्या. करोनानंतर काही रुग्णांना श्वसनसंस्था, पोट, किडनीचे त्रास होत आहेत. ते टाळायचे तर करोना टाळा. त्यासाठी गर्दीत जाणे टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. मुखपट्टी वापरणे, अंतर नियम पाळणे आणि नियमितपणे हात धुणे ही त्रिसूत्रीच आपल्याला करोनापासून वाचवू शकते याची आठवण करून देत गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

कार्तिकी एकादशीला गर्दी नको

आतापर्यंत सर्व सण आपण साधेपणाने साजरे केले. आषाढी एकादशीपण साधेपणाने व गर्दी न करता साजरी झाली. आता कार्तिकी एकादशीही गर्दी न करता साधेपणाने पण भक्तिभावाने साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

टाळेबंदी, संचारबंदी तूर्त नाही..

देशातील अहमदाबादसारख्या काही शहरांत रात्रीची संचारबंदी लागू केली जात आहे. त्यामुळे आपणही महाराष्ट्रात तसा निर्णय घ्यावा, अशा सूचना काही लोकांनी केल्या. पण, प्रत्येक गोष्ट नियम करून होत नाही. लोकांनी स्वत:हून शिस्त पाळली तर प्रषशश्न सुटतील. त्यामुळे अजून तरी राज्यात टाळेबंदी किंवा संचारबंदी लागू करण्याचा कसलाही विचार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय पथके लवकरच राज्यात

करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्राने उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात याआधीच केंद्रीय पथकांनी पाहणी केली होती. मात्र, रुग्णवाढीमुळे काही दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा केंद्रीय पथके येणार असल्याचे समजते.

शाळांबाबत प्रश्नचिन्हच

* शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु, सध्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शाळा सुरू करण्याबाबत प्रश्नचिन्हच असल्याचे ठाकरे म्हणाले.

* शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला असून, राज्यात काही ठिकाणी सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत.

* मुख्यमंत्र्यांनीच शाळांबाबत प्रश्नांकित भूमिका मांडल्याने शाळा सुरू झाल्या तरी किती काळ सुरू राहतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

राज्यात ५,७५३ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी करोनाच्या ५,७५३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात करोनामुक्तांचे प्रमाण ९२.७५ टक्के  आहे. दरम्यान, देशात रविवारी करोनाचे ४५,२०९ रुग्ण आढळले असून, ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ९०,९५,८०६ वर पोहोचली आहे.

निर्बंध लागू करण्याचा विचार : टोपे

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही निर्बंध पुन्हा लागू करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.