News Flash

दहावीच्या मूल्यमापनाबाबत संदिग्धता

‘सीबीएसई’ने त्यांच्या मूल्यमापनाचे सूत्र जाहीर करून त्याची शाळांनी अंमलबजावणीही सुरू केली.

|| रसिका मुळ्ये

अकरावीसह विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदाही रखडण्याची भीती

मुंबई :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अनुकरण करत राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घाईने जाहीर केला. मात्र, पंधरा दिवस झाले तरीही अद्याप विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याबाबत शिक्षण विभाग निष्कर्षाप्रत पोहोचलेला नाही. त्यामुळे अकरावीसह विविध अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष यंदाही रखडण्याची शक्यता आहे.

‘सीबीएसई’ने परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केल्यानंतर पालकांच्या मागणीपुढे नमते घेत राज्याच्या शिक्षण विभागानेही राज्यमंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. ‘सीबीएसई’ने त्यांच्या मूल्यमापनाचे सूत्र जाहीर करून त्याची शाळांनी अंमलबजावणीही सुरू केली. राज्यात मात्र, निर्णय जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन कसे करणार याबाबत विचार करण्यात आला नाही. आता निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवस झाले तरीही शिक्षण विभाग अद्याप विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि पुढील प्रवेश प्रक्रिया कशी करावी याचा निर्णय जाहीर करू शकलेला नाही. परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यमापन कसे करावे याबाबतच्या उपायांची चाचपणी करणारा अद्यापही निष्कर्षाप्रत पोहोचलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढलेलाच आहे. परंतु पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक यंदाही कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवेश परीक्षेचा पेच

अकरावीचे प्रवेश हे शालेय शिक्षण विभागाच्या आखत्यारितच होत असले तरी त्याशिवाय अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक), तंत्रनिकेतन (आयटीआय) यांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण, कौशल्य विकास विभागांच्या आखत्यारित होते. या दोन्ही अभ्यासक्रमांना मिळून जवळपास साडेतीन ते चार लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. दहावीच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर झाल्याशिवाय या विभागांच्या प्रवेश प्रक्रियांचाही निर्णय रखडणार आहे. परिणामी पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडणार असल्याचे दिसत आहे.

 

पर्यायांची चाचपणी…

यंदा दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांच्या गेल्यावर्षी म्हणजे नववीत दोन चाचण्या आणि सहामाही अशा तीन परीक्षा झालेल्या असणे अपेक्षित आहे. त्याचा आधार घेऊन शिक्षकांनी मूल्यमापन करावे या पर्यायाचीही चाचपणी करण्यात आली. मात्र, प्रत्येक शाळेने त्यांच्यास्तरावर केलेल्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीच्या प्रवेशासाठी स्पर्धा होणे कितपत योग्य असा प्रशद्ब्रा उपस्थित झाला आहे.

विभागातील तांत्रिक अडचण

पूर्वी माध्यमिक वर्गांचे म्हणजे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम आराखड्यापासून मूल्यमापनपर्यंतची जबाबदारी राज्यमंडळाकडे होती. मात्र, ती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे आता मूल्यमापनाबाबत निर्णय कुणी घ्यावा याबाबत विभागात मतभेद असल्याचे कळते आहे.

नवे प्रश्न…  अकरावीचे प्रवेश हे स्वतंत्र परीक्षेच्या आधारे करण्याच्या पर्यायाबाबतही अद्याप संभ्रम आहे. प्रवेशासाठी स्पर्धा असलेल्या नामवंत महाविद्यालयांसाठीच प्रवेश परीक्षा घ्यावी की सर्वच प्रवेश हे परीक्षेच्या माध्यमातून करावेत, याबाबत आतापर्यंत झालेल्या चर्चांमध्ये मतांतरे आहेत. नामवंत महाविद्यालयांसाठीच प्रवेश परीक्षा घ्यायची असल्यास ती सर्व शाखांसाठी घ्यावी का, कशी घ्यावी, कुणी घ्यावी असे प्रश्न समोर उभे राहिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:32 am

Web Title: fear of delay in admission to various courses including eleven akp 94
Next Stories
1 मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरणीला
2 राज्यातील  एकूण बाधित ५० लाखांवर
3 खाटा कमी पडल्यास पुण्यातील रुग्ण मुंबईत- उच्च न्यायालय
Just Now!
X