महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या मुलांना विविध प्रकारच्या शिक्षण शुल्कात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बालवाडीपासून ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क व वसतिगृह भत्ता मिळून वर्षांला सुमारे एक लाख रुपयांपर्यंत ही सवलत मिळणार आहे. ही ‘मेहेरनजर’ इतकी ‘दिलदार’ आहे की सनदी अधिकाऱ्याचा मुलगा नापास झाला तरी त्याचा या सवलतीवर कोणताही परिणाम होणार नाही. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशात तसे स्पष्टपणे नमूदच करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनेनुसार सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या समाजातील मुलांना शिक्षण शुल्कात सवलत देण्याचे धोरण आहे. त्यासाठी पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे. परंतु राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना शिक्षण सवलत लागू करताना उत्पन्नाची कसलीही अट घालण्यात आलेली नाही.
केंद्राने लागू केलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारच्या सेवेतील आयएएस व इतर अधिकाऱ्यांना मुलांच्या शिक्षणासाठी विशेष भत्ता ही योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्य सरकारनेही राज्याच्या सेवेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांना ही शिक्षण शुल्क सवलतीची योजना जशीच्या तशी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना वर्षांला १२ हजार रुपये वेगवेगळ्या प्रकारच्या शुल्कासाठी भत्ता मिळणार आहे. त्यात प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, प्रयोग शाळा, वाचनालय, क्रीडा इत्यादी प्रकारच्या शुल्कांचा समावेश आहे.
वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांना प्रतिमहा ३ हजार रुपये याप्रमाणे वर्षांला ३६ हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे. महागाई भत्त्यातील सुधारणानुंसार या सवलतीत वाढ होणार आहे. त्यानुसार साधारणत: या अधिकाऱ्यांना एका मुलाला वर्षांला एक लाख रुपयांपर्यंतची शुल्क सवलत मिळणार आहे. नर्सरी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना ही सवलत लागू राहणार आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सलग उत्तीर्ण झाल्यास शिक्षण शुल्कात सवलत मिळते, परंतु आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना हा नियम लागू करण्यात आलेला नाही. एखाद्या वर्गात मुलगा नापास झाला तरी, त्याला ही सवलत मिळणार आहे, असे १२ मार्चला काढण्यात आलेल्या या शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
एक लाखांपर्यंत सवलत : आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, प्रयोग शाळा, वाचनालय, क्रीडा इत्यादी प्रकारच्या शुल्कासाठी वर्षांला १२ हजार रुपये मिळणार आहेत. वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांना प्रतिमहा तीन हजार रुपये याप्रमाणे वर्षांला ३६ हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे. महागाई भत्त्यातील सुधारणानुंसार या सवलतीत वाढ होणार आहे. त्यानुसार साधारणत: या अधिकाऱ्यांना एका मुलाला वर्षांला एक लाख रुपयांपर्यंतची शुल्क सवलत मिळणार आहे.