मुंबई : पदविका अभ्यासक्रमांना ‘व्यावसायिक’ अभ्यासक्रमांच्या व्याख्येतून वगळण्यात आले असून हे अभ्यासक्रमांची शुल्क नियमन प्राधिकरणाच्या कचाटय़ातूनही सुटका झाली आहे. अभ्यासक्रम व्यावसायिक नसल्यामुळे त्याचे शुल्क ठरवण्याचा अधिकार नसल्याचे उत्तर शुल्क नियामक प्राधिकरणाने संस्थांना दिले आहे. मात्र, त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या शुल्कावर आता कुणाचे नियंत्रण राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अभियांत्रिकी, वास्तूकला, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, वैद्यकीय, वैद्यकीय पूरक, विधि आदी शाखांमधील सर्व अभ्यासक्रम हे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. या अभ्यासक्रमांचे प्रवेश, शुल्क यासाठी स्वतंत्र नियमावली करण्यात आली होती.

शुल्क नियमन प्राधिकरणाच्या माध्यमातून या अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यात येत होते. मात्र आता अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांचे पदविका अभ्यासक्रम ‘व्यावसायिक’ अभ्यासक्रमांच्या कक्षेतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या शुल्कावर प्राधिकरणाचे असलेले नियंत्रण आता राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचेच शुल्क प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येणार आहे. ‘अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र या विषयांचे पदविका अभ्यासक्रम हे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कक्षेतून वगळण्यात आल्यामुळे त्यांचे शुल्क ठरवण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्टीकरणे प्राधिकरणाकडून संस्थांनी विचारलेल्या प्रश्नावर देण्यात आले आहे.

प्राधिकरणाने पदविका अभ्यासक्रमांच्या शुल्क निश्चितीची जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता पुढील वर्षीचे शुल्क कुणाकडून निश्चित करून घ्यायचे, असा संस्थांचाही गोंधळ झाला आहे.

संस्थांना शुल्क निश्चितीचे मोकळे रान

अभियांत्रिकी शाखेच्या पदविका अभ्यासक्रमासाठीचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटला असला तरीही औषधनिर्माणशास्त्र आणि हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांतून फायदा मिळवण्याकडे संस्थांचाही कल आहे. मात्र आता या अभ्यासक्रमांच्या शुल्कावर आता प्राधिकरणाचे नियंत्रण नाही आणि दुसरी यंत्रणाही निश्चित झालेली नाही. त्यामुळे संस्थांना आता मनमानी शुल्क घेण्यासाठी मोकळे रान मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.