उन्नाव, कठुआ बलात्काराच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या कँडल मार्चदरम्यान एका महिला काँग्रेस कार्यकर्तीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने पक्षाच्या मुंबई शहर विभागाकडे याची तक्रार केली आहे.

मुंबई काँग्रेसने हा कँडल मार्च जुहू येथे आयोजित केला होता. या प्रकरणाची माहिती सदर महिलेने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडे दिली असून, त्यांनी दोषी आढळलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलेने या घटनेबद्दलचा संदेश मोबाइलद्वारे पाठवल्याचे संजय निरुपमयांनी सांगितले. तसेच ही महिला जिल्हा-पातळीवरील कार्यकर्ती असल्याची माहिती दिली.

बलात्काराच्या निषेध कँडल मार्चमध्येच युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांकडून अशी खालच्या पातळीवरील घटना घडने ही शरमेची बाब आहे. या घटनेमुळे पक्षातील महिला कार्यकर्त्यांना असुरक्षितता वाटू लागली असल्याचे पीडीत महिलेने आपल्या संदेशातून म्हटले आहे.

यातील दुःखद बाब म्हणजे मिडियामध्ये आपले चेहरे झळकण्यासाठी या पुरूष कार्यकर्त्यांना पुढे जायचे होते. त्यासाठी त्यांनी आम्हाला ढकललं आणि ते पुढे कॅमेऱ्यासमोर गेले असं या महिलेनं म्हटलं आहे. भविष्यात होणार्या मोर्चांमध्ये तरी महिला कार्यकर्त्यां सुरक्षित असतील का? असा प्रश्न या महिलेनं उपस्थित केला आहे.

निरुपम यांनी ही घटना अतिशय दुर्दैवी असून मी त्याचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. पीडीत महिलेने जर त्या कार्यकर्त्यांची ओळख पटवून दिल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन निरुपम यांनी दिले. परंतू कँडल मार्चदरम्यान खूप गर्दी असल्यामुळे ओळख पटवणे शक्य होणार नसल्याचे महिलेने सांगितले. दरम्यान, या पुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून मोर्चाच्या वेळी कसं वागावं याची मार्गदर्शक प्रणाली आम्ही कार्यकर्त्यांना आखून देऊ असं आश्वासन निरूपम यांनी दिलं आहे.