महिला प्रवाशांच्या तिकीट खिडक्यांसमोर मोठ्या रांगा; रेल्वेचे नियोजन फसले, सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा

मुंबई : सर्वच महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर अनेक खासगी कार्यालयांच्या वेळांमध्येही गुरुवारपासूनच बदल करण्यात आले. परिणामी सकाळी ११ वाजता लोकल प्रवासासाठी स्थानकातील तिकीट खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तिकीट खिडक्यांची अपुरी संख्या, बंद एटीव्हीएममुळे तिकीट मिळवण्यासाठी महिला प्रवाशांचा बराच वेळ खर्ची पडला. रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका महिला प्रवाशांना बसला आणि सुरक्षित अंतर न राखताच तिकिटांच्या रांगेत एकच गर्दी झाल्याचे चित्र पश्चिम व मध्य रेल्वेवरील काही स्थानकांत दिसत होते.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील व विविध कामांनिमित्त जाणाऱ्या महिलांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर लोकल प्रवासाची परवानगी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या वेळांमुळे काही खासगी कार्यालयांनी महिलांना गुरुवारपासूनच कार्यालयात येण्याच्या वेळेत बदल के ले आणि महिला कर्मचाऱ्यांना दुपारी १२ किं वा १ वाजेपर्यंत कार्यालयात येण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेक महिलांनी कार्यालयाची वेळ, लोकल प्रवासाची वेळ पाहता सकाळी १० वाजताच स्थानक गाठून तिकीट व पासाच्या रांगेत उभे राहण्यास सुरुवात के ली. टाळेबंदीआधी तिकीट खिडक्यांच्या शेजारीच एटीव्हीएम असल्याने अनेक जण स्मार्टकार्ड वापरून येथून तिकीट मिळवत होते किं वा या यंत्राजवळच असलेल्या रेल्वेच्या मदतनीस कर्मचाऱ्याकडून तिकीट दिले जात होते, परंतु बहुतांश स्थानकांमधील ही यंत्रेही बंदच आहेत. परिणामी सर्व ताण हा तिकीट खिडक्यांवरच येऊ लागला. त्यातच स्थानकात एक ते दोनच तिकीट खिडक्या सुरू ठेवल्याने मध्य रेल्वेवरील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, ठाणे, मुलुंड, घाटकोपरसह पश्चिम रेल्वेवरील वांद्रे, दादर, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, वसई, विरार यांसह अन्य स्थानकांत महिलांच्या भल्या मोठ्या रांगाच लागलेल्या होत्या. तिकीट किं वा पास मिळवण्यासाठी अर्धा तास लागत होता.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

तिकीट खिडक्यांवरून अत्यावश्यक सेवा कर्मचारीही तिकीट घेत असल्याने समस्या येऊ लागली. काही स्थानकांत एक तिकीट खिडकी महिलांसाठी, तर दुसरी तिकीट खिडकी पुरुष व महिलांसाठी अशा होत्या. त्यामुळे सुरक्षित अंतराचाही फज्जा उडत होता. तिकीट खिडक्या वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नव्हते. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ जात होता. यात स्थानक अधिकारी वा रेल्वे पोलीस यांच्याकडून प्रवाशांना सुरक्षित अंतराच्या नियमांचीही आठवण करून दिली जात नव्हती.