नव्वदच्या दशकातील अमोल पालेकर यांच्या ‘पाऊलखुणा’ मालिकेची आठवण सांगताना, ‘कोणतीही महिला स्त्रीवादी म्हणून जन्म घेत नाही. महिलांमध्ये स्त्रीवादी जाणीव स्वानुभवातून येते’, असे मत लेखिका शांता गोखले यांनी व्यक्त केले.

एनसीपीए येथे आयोजित ‘गेट वे लिटफेस्ट’मध्ये रविवारी शांता गोखले यांची मुलाखत लेखक आणि पत्रकार जेरी पिंटो यांनी घेतली. यावेळी शांता गोखले यांनी आपल्या साहित्यातील स्त्रीवादाविषयी भाष्य केले.

पाऊलखुणा मालिकेत शांता गोखले यांनी आजीची भूमिका साकोरली होती आणि दुर्गा जसराज नातीच्या भूमिकेत होत्या. ‘एकच प्याला’ या नाटकात स्त्री तिच्या दारू प्यायलेल्या नवऱ्याचे पाय धरते असा प्रसंग आहे. या नाटकात काम करणारी नात अशा प्रकारे दारूडय़ा नवऱ्याचे पाय धरण्यास नकार देते असा प्रसंग मालिकेत होता. त्या नातीला असे म्हणण्याची हिंमत ज्यांच्यामुळे मिळाली, त्या स्त्रियांची कहाणी आजी सांगते. मालिकेच्या या पहिल्या भागातील प्रसंगाप्रमाणेच समाजातील इतर स्त्रियाही स्वतच्या अनुभवातून स्त्रीवादाकडे वळत असतात, असे शांता गोखले म्हणाल्या.

शांता यांनी आपल्या ‘रिटा वेलिंगकर’ या पुस्तकातील काही अंश वाचून दाखवला. कामाच्या ठिकाणी होणारे शोषण रोखणारे कोणतेही कायदे अस्तित्वात नव्हते अशा ऐंशीच्या दशकातील हे पुस्तक आहे. यातील ‘संगीता’ हे पात्र

नव्या पिढीची प्रतिनिधी आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करत असताना वरिष्ठ पदावरील

पुरुषाच्या गैरवर्तनाला विरोध केल्यानंतर तिला नोकरी गमवावी लागते. स्वतला स्त्री म्हणून ओळखू लागलेल्या आणि व्यवस्थेतील शत्रूशी परिचित झालेल्या महिलांची कहाणी शांता यांनी संगीताच्या उदाहरणातून सांगितली.

त्या काळात महिला नुकत्याच स्वतला ओळखू लागल्या होत्या. स्त्रीवादी म्हणून बरेच आदर्श लोकांसमोर होते. ‘नोरा’ हे पात्र नवऱ्याशी झालेल्या वादानंतर घर सोडून निघून जाते. त्यामुळे घर सोडून जाणारी स्त्री सबला मानली जात होती. मात्र माझ्या कादंबरीतील महिला वास्तव स्वीकारून जगत आहेत आणि इतर महिलांना पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे ‘रिटा वेलिंगकर’ला स्त्रीवादी वाचकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे शांता गोखले म्हणाल्या.

त्यानंतर १७ वर्षांनी आलेल्या शांता यांच्या ‘त्या वर्षी’ या मराठी कादंबरीतील ‘अनिमा’ हे पात्र एक पाऊल पुढे टाकणारे ठरते. ट्रेनमधून प्रवास करत असताना पुरुषांना पाय पसरून बसण्याची सवय असते. त्यामुळे अधिक जागा व्यापली जाते. ‘जरा नीट बसा’ अशी सूचना केल्यावर पुरुष इतरांचे लक्ष वेधून घेत आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतात. यावर उपाय म्हणून अनिमा स्वतजवळ कायम एक टाचणी ठेवत असते. हळूच टाचणी टोचून ती पुरुषांना सरकायला भाग पाडते आणि जागा मिळवते. अशा प्रकारे शांता गोखले यांनी महिलांमधील ‘स्व’ची जाणीव अधोरेखित केली.

‘पुरुषांच्या मनात स्त्रीवादाच्या चुकीच्या कल्पना’

‘शांता गोखले यांच्या लेखांचा संग्रह करावा असा विचार माझ्या मनात आला होता. मात्र त्यांच्याकडे त्यांच्या लेखांची कात्रणेच नव्हती. महिला नेहमीच इतरांसाठी काम करत राहतात. असे न करता महिलांनी स्वतसाठी वेळ काढावा’, असे जेरी पिंटो म्हणाले. एखाद्या महिलेसाठी दरवाजा उघडणे, तिच्या सौंदर्याचे कौतुक करणे किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर पुरुषाने बिल भरणे, अशा स्त्रीवादाच्या चुकीच्या कल्पना पुरुषांच्या डोक्यात असल्याचेही जेरी यांनी निदर्शनास आणले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आईची मुलाखत घेऊन त्यावर १० हजार शब्दांचा निबंध लिहायला सांगितले होते. त्यानंतर आईशी असलेले मुलांचे नाते अधिक घट्ट झाल्याचा अनुभव जेरी यांनी सांगितला.