अपयशी कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता; देवनार कचराभूमीत पालिकेची धावाधाव
खतनिर्मिती करण्यात अपयशी ठरलेल्या कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता दाखविण्याच्या तयारीत असलेल्या पालिकेने देवनार कचराभूमीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम स्वत:च करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पोकलेन, जेसीबी आणि डंपर भाडेतत्वावर घेण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
देवनार कचराभूमीत कचऱ्याचे आच्छादन करणे आणि प्रतिदिन २ हजार मे. टन क्षमतेचा खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम २००९ मध्ये कंत्राटदारास देण्यात आले होते; मात्र खत निर्मिती प्रकल्प न उभारल्यामुळे या कंत्राटदारावर पालिकेने नोटीस बजावली असून कंत्राट रद्द करून त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे देवनार कचराभूमीतील कामांचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत.
दररोज देवनार कचराभूमीत येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तेथील रस्त्यालगतच्या नाल्यातील गाळ काढणे, कचऱ्याच्या उंच ढिगाऱ्याचे स्थानांतरण करणे, कचरा सपाटीकरण आणि उंचावर स्थानांतरित करणे आदी विविध कामांसाठी पोकलेन, जेसीबी आणि डंपरची आवश्यकता भासणार आहे. पालिकेकडे ही यंत्रसामग्री नसल्यामुळे ती भाडेतत्वावर घेण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे.
त्यासाठी अलिकडेच निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती पालिकेने ‘सनरेज इन्टरप्रायजेस्’कडून दोन जेसीबी आणि तीन डंपर भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सुमारे सहा कोटींचा खर्च
वर्षभरात आठ तासाची एक पाळी याप्रमाणे वर्षभरात डंपरच्या ३,२८५, तर जेसीबीच्या २,१९० पाळ्यांसाठी ‘सनरेज इन्टरप्रायजेस्’ला २ कोटी ३३ लाख ४५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी अनुक्रमे प्रतिपाळी तीन हजार ५०० रुपये आणि पाच हजार रुपये भाडे देण्यात येणार आहेत, तसेच प्रतिपाळी आठ हजार २३० रुपये भाडे देऊन अंशुमन आणि कंपनीकडून १२ पोकलेन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. वर्षभरात १२ पोकलेनचा वापर ४,३८० पाळ्यांमध्ये करण्यात येणार असून कंत्राटदाराला एकूण ३ कोटी ७७ लाख १७ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर यंत्रसामग्री भाडेतत्वावर घेण्यात येणार असून त्यानंतर देवनार कचराभूमीत पालिकेला काम सुरू करता येणार आहे.