महागाई आणि आर्थिक मंदी यांमुळे सणासुदीत भारतीय बाजाराला लागलेले ग्रहण आता हळूहळू सुटू लागले आहे. घसरती महागाई, कमी झालेले इंधनदर, सोने-चांदीच्या दरांतील नरमाई यांमुळे सर्वसामान्याचा खरेदीकडील ओघ वाढू लागला आहे. तर दुसरीकडे, अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि आश्वासक चित्रामुळे बाजारपेठाही ग्राहकांपुढे आकर्षक सवलतींच्या पायघडय़ा घालत आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजार पुन्हा एकदा उजळला आहे.
मे महिन्यात सत्तेत आल्यापासून भाजपप्रणित सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत बाजारात आश्वासक वातावरण निर्माण केले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि सोनेचांदीच्या किमती घसरत चालल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. या सर्व कारणांमुळे बाजारात नव्याने उल्हास दिसून येत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरांत बदल केलेला नाही. मात्र, तरीही बँकांकडून कर्जदारांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जात आहेत.
*सोनेखरेदीचा एक मुहूर्त असलेल्या दसऱ्यातही सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसली नाही. परिणामी सोने अद्यापही २७ हजार रुपयांपर्यंत आहे.
*मागील वर्षी सोन्याच्या किमती तोळ्याला ३० ते ३१ हजार रुपयांपर्यंत गेल्या होत्या, तर चांदीची किलोची किंमत ५० हजारांपर्यंत गेली होती.
*गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्वस्ताई असल्याने खरेदी वाढल्याचे ‘पीएनजी’ ज्वेलर्सचे अजित गाडगीळ यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमधील मौल्यवान धातूंच्या दरातील नरमाई ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे.
वाहनांच्या बाजारात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चांगली स्थिती आहे. गेल्या महिन्यातील वाढत्या वाहन विक्रीनेही यंदाच्या दसऱ्याला आशावादी वातावरण तयार केले आहे. ‘वाहनांच्या बाजारात दहा टक्क्यांची वाढ आहे. ही अपेक्षित वाढ नसली तरी येणारा काळ चांगला असेल,’ असे ‘क्रिस्टल होंडा’चे सचांलक कौशक कोठारी म्हणाले.
ग्राहकांच्या उत्साहाचा सर्वाधिक फायदा इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला होत आहे. विविध कंपन्यांच्या आकर्षक सवलती आणि त्याजोडीला मोठमोठय़ा दुकानदारांकडून देण्यात येणाऱ्या ऑफर्स यामुळे टीव्ही, मोबाइल, फ्रीज, लॅपटॉप यांच्या खरेदीला जोर आला आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळांवरही इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक आहे.