ताप, सर्दी, घसादुखी या विकारांनी मुंबईकर हैराण

अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा यांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना बर्फाचे गारेगार पाणी रामबाण उपाय वाटत असला तरी घशाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अचानकपणे वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांना ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखीने हैराण केले आहे. मुंबईमध्ये उष्माघाताचा धोका नसला तरी उन्हाच्या चटक्यांमुळे रिचवल्या जाणाऱ्या थंड पेयांमुळे आजार वाढले आहेत.

मुंबईत रविवारपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा तब्बल ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अनेकदा ऋतुबदलाच्या काळामध्ये विषाणूंची संख्या वाढते आणि विषाणू संसर्गामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. मात्र या वेळी अचानक वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामध्येही विषाणू संसर्गामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. उन्हामुळे होणारी शरीराची काहिली कमी करण्यासाठी प्यायल्या जाणाऱ्या शीतपेयांमुळे विषाणूजन्य संसर्ग आजारांचे प्रमाण वाढले आहे.

सध्या विषाणू संसर्गामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढले आहेत. यासोबतच घशाचा संसर्ग, शरीरातील पाणी कमी झाल्याने थकवा वाटणे, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारासाठी येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने घशाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कडक उन्हामुळे शरीरातील पाणी झपाटय़ाने कमी होत असल्याने जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र अनेक जण थंड पेय किंवा कृत्रिम फळांचा रस पिण्याला प्राधान्य देतात. या पदार्थामध्ये पाणी, साखर, मीठ यांचे प्रमाण योग्यरीतीने नसते. त्यामुळे कृत्रिम पेये प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणामध्ये मीठ आणि साखर मिळत नसल्यानेही बऱ्याचदा ही पेय प्यायल्याने थकवा दूर होत नाही. तेव्हा अशा वेळी साधे पाणी किंवा लिंबू पाणी पिणे शरीराला फायदेशीर असल्याचे मत डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केले. उष्णतेमुळे नाकातून रक्त वाहत असल्याच्या तक्रारी घेऊनही काही रुग्ण येत असल्याचे पुढे डॉ. लेले यांनी सांगितले.

उकाडय़ामुळे सारखी तहान लागत असल्याने अतिथंड पेये प्यायली जातात. या पेयांमधील दूषित पाण्यामुळेही रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या रुग्णांना लगेचच विषाणूंचा संसर्ग होत असतो. तेव्हा अशा व्यक्तींनी या दिवसांमध्ये शक्य तितकी काळजी घ्यावी. अतिथंड पेय पिण्यापेक्षासारखे पाणी प्यावे. त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो. – डॉ. केतन मेहता