लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे आठ महिने बंद असलेली राज्यातील चित्रपटगृहे पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहेत. मात्र, करोनाचे संकट कायम असल्यामुळे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक येण्याची शक्यता कमी असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे खेचण्यासाठी ‘फत्तेशिकस्त’, ‘चोरीचा मामला’, ‘हिरकणी’ आणि ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे लोकप्रिय मराठी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आहेत.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर राज्य शासनाने पन्नास टक्के चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिल्यावर १५ नोव्हेंबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरू करण्यात आली. असे असले तरी नवे बिग बजेट हिंदी आणि मराठी चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यासाठी निर्मात्यांनी लोकप्रिय चित्रपट पुनर्प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंदीत सध्या ‘मलंग’, ‘वॉर’, ‘सूरज पे मंगल भारी’ हे जुनेच चित्रपट पुनर्प्रदर्शित केले जात आहेत, तर मराठीत दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’, सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला ‘हिरकणी’, प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘चोरीचा मामला’ हे चित्रपट पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, मुंबई यांतील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले आहेत.

नव्या चित्रपटांसाठी नियोजन

‘सरकारने चित्रपटगृह सुरू करण्याला परवानगी दिल्यावर लगेचच कोणतेही नवीन चित्रपट प्रदर्शित होणार नव्हते. प्रेक्षकांना चित्रपटगृहात येण्याची सवय व्हावी यासाठी आम्ही ‘चोरीचा मामला’ चित्रपट पुनप्र्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात हा चित्रपटात १५ ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. लवकरच आम्ही ‘बबन’ हा चित्रपटही प्रदर्शित करण्याच्या तयारीत असल्याचे सिनेवितरक अंकित चंदीरामानी यांनी सांगितले. २० नोव्हेंबरपासून ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट निवडक चित्रपटगृहात प्रदर्शित के ला आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते पुनीत बालन यांनी दिली. या चित्रपटांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर निर्माते नवे चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन आखणार आहेत.