नवरात्रोत्सव साधेपणाने; शासनाच्या नियमांची प्रतीक्षा

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : स्थलांतरात आपली संस्कृतीही सोबत घेऊन आलेल्या बंगाली भाषकांनी मुंबईत पाय रोवताना बंगाल प्रांतातील अनोखा दुर्गा पूजेचा उत्सवही मुंबईत रुजवला. बंगाली शैलीचे मोठाले मंडप, तिथल्या अस्सल कारागिरीतून घडलेल्या मूर्ती अशी खासियत असलेली दुर्गापूजा यंदा साधेपणाने करण्याचा निर्णय  विविध उत्सव समित्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे तरुण कार्यकर्त्यांकडून पुढे आलेल्या विचारानुसार बंगाली नवरात्रोत्सवाचे वैशिष्टय़ असलेल्या मूर्तिपूजेऐवजी घटपूजेला प्राधान्य देण्याचा मानस उत्सव प्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर  दुर्गापूजेचा उत्सवही मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थिती होणार आहे. देवीच्या मूर्तीसोबत घटपूजेचा मान या पूजेला असल्याने अनेक मंडळांनी मूर्ती न उभारता केवळ घटस्थापना करण्याच्या निर्णय घेतला आहे. ‘दरवर्षी २० फुटाची मूर्ती घडवली जाते. परंतु यंदा पूजा कशी पार पाडावी, स्वरूप कसे असावे याबाबत चर्चा सुरू आहे. मंडपाची परवानगी, मूर्तीची घडवणूक याबाबतही सरकारी सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रतीकात्मक उत्सव करण्याकडे कल असेल. विशेष म्हणजे तरुण कार्यकर्त्यांकडून केवळ घटस्थापना करण्याचा विचार पुढे येत आहे,’ अशी माहिती वांद्रे पश्चिम येथील नूतनपल्ली सार्वजनिक दुर्गा उत्सवाचे शंकर मेषो यांनी दिली.

शिवाजी पार्कवरील बंगाल क्लबची दुर्गापूजा मुंबईत प्रसिद्ध आहे. दरवर्षी १६ फुटी मूर्ती इथे विराजमान होते. परंतु यंदा चार फुटाची मूर्ती घडवण्यात येणार आहे. शिवाय उत्सवकाळात गर्दी जमू नये यासाठी समितीच्या निवडक लोकांना प्रवेश देऊन अन्य भाविकांसाठी ‘लाइव्ह’ दर्शनाची व्यवस्था असेल. तर ‘घटस्थापना करून दुर्गापूजा होईल. परंतु सरकारी निर्देशांची वाट पाहत आहोत. नियमांचे पालन करत उत्सव केला जाईल,’ असे गोरेगाव येथील दुर्गा पूजेचे प्रमुख उत्पल चौधरी यांनी सांगितले.

कशी असते दुर्गापूजा?

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला बंगाली भाषकांचा नवरात्रोत्सव सुरू होतो. देवीची भव्य मूर्ती, सोबत सरस्वती, लक्ष्मी, गणपती, कार्तिक आदी देवतांच्या मूर्ती अशी एकत्रित पूजा केली जाते. या मूर्ती कोलकाताहून आणलेल्या मातीपासून घडवल्या जातात. त्यासाठी दोन महिने आधी बंगालहून कलाकार दाखल होतात. खास बंगाली शैलीतील कापडी महाल उभारले जातात. दररोज विविध पूजा, होम, पारंपरिक कार्यक्रम असा सोहळा असतो. ज्या ठिकाणी ही दुर्गापूजा होते तिथे आसपासच्या विभागातील सर्व बंगाली भाषिक उत्सव साजरा करतात.

उत्सवाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला

‘देवीची मूर्ती घडवणारे कलाकार नुकतेच बंगालहून येऊ घातले आहेत. उत्सव साजरा करत असताना सामाजिक जाणीव जपली जाईल. उत्सवात जमलेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येईल. तसेच रक्तदान आणि इतर सामाजिक उपक्रमही उत्सवकाळात होतील,’ असे बंगाल क्लबचे अध्यक्ष जॉय चक्रवर्ती यांनी सांगितले.