शैलजा तिवले

करोनामुक्त झालेल्या आणि गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांपैकी सुमारे ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये फुप्फुसांचा फायब्रोसिस झाल्याचे आढळते; परंतु हा फायब्रोसिस बरा व्हायला किती काळ लागेल, बरा होईल का, याबाबत मात्र आणखी काही काळ गेल्यानंतर ठोसपणे सांगता येईल, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

करोनाचा संसर्ग झाल्यावर गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने फुप्फुसावर परिणाम झालेला आढळतो. ज्या रुग्णांच्या फुप्फुसांवर गंभीर परिणाम होतो, त्यापैकी काहींमध्ये प्रकृती स्थिर होताना फुप्फुसाचा फायब्रोसिस झाल्याचे निदर्शनास आले आहे. जखम झाल्यानंतर ती भरून येताना व्रण येतो. त्याप्रमाणे संसर्गामुळे फुप्फुसांच्या ऊतींना झालेल्या जखमा भरून येताना फुप्फुसावर व्रण येतो. यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावते.

करोनामुक्त झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होऊन हृदय, हात-पाय या अवयवांवर दुष्परिणाम होत असला तरी या रुग्णांची संख्या कमी आहे. फुप्फुसाचा फायब्रोसिस झालेल्या रुग्णांची संख्या मात्र तुलनेने अधिक आहे. करोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या बाह्य़रुग्ण विभागात आतापर्यंत १० ते १२ रुग्णांना फायब्रोसिस झाल्याचे आढळले. वयोगटाशी याचा संबंध नाही.

ज्येष्ठांप्रमाणे तरुणांमध्येही फायब्रोसिस झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

या रुग्णांना दहा पावले चालले तरी धाप लागते. त्यामुळे काही रुग्णांना घरी गेल्यावरही ऑक्सिजन लावावा लागतो. इतर अवयवांवरील परिणाम काही काळाने बरे होत असले तरी फायब्रोसिस बरा होण्यासाठी बरेच महिने लागत आहेत. फुप्फुसावर गंभीर परिणाम झालेल्या ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये फायब्रोसिस होत असल्याचे आढळले आहे, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.

सर्वसाधारणपणे तरुणांमध्ये न्यूमोनिया झाल्यास चार आठवडय़ांत बरा होतो. ज्येष्ठ व्यक्तींना त्यासाठी १२ आठवडे लागतात; परंतु करोना संसर्गानंतर काही व्यक्तींमध्ये चार महिन्यांहूनही अधिक काळ लागत आहे. फुप्फुसाच्या फायब्रोसिसप्रमाणे याचे चित्र दिसत असले तरी मार्च, एप्रिलमध्ये संसर्ग झालेल्या आणि त्यानंतर फायब्रोसिस झालेल्यांपैकी ८० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरीदेखील गेले आहेत.

हा विषाणू नवीन असल्याने संसर्गानंतर गंभीर प्रकृतीच्या काही रुग्णांना झालेला फायब्रोसिस बरा होण्यास किती काळ लागतो, बरा होणार की नाही याबाबत सध्या निष्कर्ष काढणे अवघड असल्याचे केईएम रुग्णालयाच्या श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी स्पष्ट केले.

अन्य संसर्गापासून बचाव आवश्यक

फुप्फुसांच्या ऊती कमजोर असल्याने या काळात रुग्णांना स्वाइन फ्लू किंवा अन्य संसर्ग झाल्यास धोका वाढू शकतो. त्यामुळे इतर संसर्ग होणार नाही याची काळजी या रुग्णांनी घेणे गरजेचे आहे. यासाठी संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक लशी घेणेही फायदेशीर असल्याचे मत डॉ. राहुल पंडित यांनी मांडले.

ही काळजी घ्या..

* फायब्रोसिस झालेल्या व्यक्तींना सतत धाप लागते. काही वेळेस बाहेरूनही ऑक्सिजन देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे बरे झाल्यानंतर अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.

*  अशा रुग्णांनी घरी असताना जमेल आणि झेपेल तितकीच कामे करावीत. शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर सातत्याने देखरेख करणे गरजेचे आहे.

* आवश्यकतेप्रमाणे बाहेरील ऑक्सिजनची मात्रा वाढविणे आवश्यक असते. तसेच कुवतीप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी, व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. अमिता आठवले यांनी सांगितले.