विश्वचषकाचा अंतिम सामना अनुभवण्यासाठी विविध पब, रेस्टो बारकडून खास सोय

गेले महिनाभर दिवसाचे काम आणि रात्रीचे जागरण याचा हिशोब न मांडता फिफाचा थरार अनुभवणाऱ्या क्रीडाप्रेमींचा सगळ्यात उत्कंठावर्धक क्षण साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी कंबर कसली आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यामध्ये रविवारी रात्री साडेआठ वाजता रंगणार आहे. हा सामना पाहण्याची मजा अनुभवता यावी यासाठी मुंबईत हॉटेल, पब्ज अशा वेगवेगळ्या ठिकाणी फुटबॉलप्रेमींना सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हा अंतिम आणि चुरशीचा सामना पाहण्यासाठी मुंबईतही फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते आहे. पावसामुळे मुंबईचा वेग काहीसा मंदावला असला तरी तो पूर्वपदावर येतो आहे. त्यामुळे फक्त घरी बसून टीव्हीवर हा सामना पाहण्यापेक्षा बाहेर एकत्र जमून फ्रान्स आणि क्रोएशियातील काँटे की टक्कर अनुभवण्याचे बेत मुंबईकरांनी आखले आहेत. विश्वचषकाचा हा अंतिम सामना रशियात रंगणार आहे. त्याच वेळी इथे सातासमुद्रापार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देता देता पोटपूजा करण्याचीही संधी फुटबॉलप्रेमींनी सोडू नये, या हेतूने ओपन एअर स्क्रिनिंगच्या ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ आणि पिण्यासाठी विविध पेये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कोणी मित्रांसोबत एखाद्या आलिशान रेस्टॉरंटमध्ये जाऊन सामना पाहण्याचा आनंद लुटणार आहेत. तर काही ठिकाणी घरात जमून काही मित्र एकत्र सामना पाहण्याचा विचार करत आहेत. मुंबईतील जीओ गार्डन, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भव्य अशा पार्टी स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरीच्या फन रिपब्लिक जवळ राईक (टेरेस बार आणि ग्रील), साकीनाका जंक्शनजवळील टॅप रेस्टो बार आणि लाऊंज, द सॅसी स्पून – नरिमन पॉइंट, लेडी बगा – लोअर परळ, जुहू येथील कोपा, द कॉफी वर्क्‍स – चेंबूर, बॉम्बे कोर्ट बार – अंधेरी अशा काही ठिकाणी मस्त सामना पाहात खवय्येगिरीचाही आनंद घेण्यासाठी जाण्याचा बेत आखू शकता. लोअर परळ येथील हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये अधिकृतपणे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातही सामना पाहण्याचा आनंद घेता येऊ शकतो. क्रिकेटचे वेड असलेल्या भारतात आता फुटबॉलसाठीही तेच वेड क्रीडाप्रेमींमध्ये दिसून येते आहे. त्यामुळे रविवारी एरव्ही आपल्यातच रमणाऱ्या मुंबई शहरात आणि उपनगरांतून आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.