News Flash

मुंबईत ‘सेरो सर्वेक्षणा’ची पाचवी फेरी १५ जुलैपासून

सर्व वयोगटातील व्यक्तींचे सर्वेक्षण; २४ विभागांमध्ये फेरी राबवणार

सर्व वयोगटातील व्यक्तींचे सर्वेक्षण; २४ विभागांमध्ये फेरी राबवणार

मुंबई : मुलांमधील सर्वेक्षणानंतर आता मुंबईत १५ जुलैपासून सेरो सर्वेक्षणाची पाचवी फेरी सुरू होणार आहे. यात शहरातील बालके  वगळता सर्व वयोगटांतील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किती टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिपिंडे तयार झाली आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आता सेरो सर्वेक्षणाची पाचवी फेरी राबविणार आहे. तिसऱ्या फेरीप्रमाणेच मुंबईतील २४ विभागांमध्ये ही फेरी राबविण्यात येणार आहे. बालकांचे सर्वेक्षण झाल्यामुळे त्यांचा यात समावेश केला जाणार नाही. या व्यतिरिक्त सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश यात करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातून १५० असे सुमारे चार हजार नमुने या सर्वेक्षणात घेण्यात येतील. १५ जुलैपासून ही फेरी सुरू होणार  असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता असल्याने पालिकेने नुकतेच चौथ्या फेरीमध्ये बालकांचे सेरो सर्वेक्षण केले. यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक बालकांमध्ये प्रतिपिंडे असल्याचे आढळले.

मुंबईत ८० टक्के लोकसंख्या करोनाबाधित होऊन गेली असल्याची शक्यता टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अभ्यासात वर्तविण्यात आली. त्यामुळे तिसरी लाट आली तरी त्याची तीव्रता दुसऱ्या लाटेइतकी नसेल, असा अंदाजही या अभ्यासात व्यक्त केला आहे. शहरात पहिल्या लाटेमध्ये झोपडपट्टी भागात करोनाचा उद्रेक मोठय़ा प्रमाणात झाला होता, तर दुसऱ्या लाटेमध्ये बिगरझोपडपट्टी भागात संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे आता झोपडपट्टी भागातील प्रतिपिंडाचे प्रमाण कमी झाले असल्याची शक्यता आहे.

बिगरझोपडपट्टी भागांत प्रतिपिंडांचे प्रमाण २८ टक्के

* सर्वेक्षणाची पहिली आणि दुसरी फेरी अनुक्रमे जुलै आणि ऑगस्ट २०२० मध्ये तीन विभागांत राबविली गेली.

* सर्वेक्षणाची तिसरी फेरी एप्रिल २०२१ मध्ये राबिवली गेली. यात मुंबईतील सुमारे १० हजार नमुने घेतले होते.

* झोपडपट्टी विभागातील प्रतिपिंडाच्या प्रमाणात घट झाल्याचे यात आढळले होते.

* या सर्वेक्षणात सुमारे ४१ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळली होती.

* जुलै २०२० मध्ये राबविलेल्या पहिल्या फेरीत हे प्रमाण ५७ टक्के होते.

* बिगरझोपडपट्टी विभागात मात्र प्रतिपिंडाचे प्रमाण या फेरीत वाढल्याचे दिसून आले.

* या भागात सुमारे २८ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण आढळले होते, तर २०२० मध्ये हे प्रमाण १८ टक्के होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 11:21 am

Web Title: fifth round of sero survey in mumbai from july 15 zws 70
Next Stories
1 लसीकरण केंद्रांवर गोंधळ कायम
2 अनुचित घटना घडल्यास महापौर, नगरसेवकही जबाबदार!
3 मुंबई परिसरातील तलावांचे आरोग्य धोक्यात
Just Now!
X