तृतीय वर्षांच्या विद्यार्थी-शिक्षकांमध्ये नाराजी

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राची परीक्षा यंदा ऐन दिवाळीत होणार असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. दिवाळीची सात दिवसांची सुट्टी सोडली तर संपूर्ण दिवाळीच्या सुट्टीभर परीक्षांचे आयोजन करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. यात विद्यार्थी-शिक्षकांचे सुट्टीचे नियोजन कोसळणार असल्याने त्यांच्या मोठय़ा नाराजीला विद्यापीठाला तोंड द्यावे लागणार आहे.

कला, विज्ञान आणि वाणिज्य या विद्याशाखांच्या पाचव्या सत्राची परीक्षा दरवर्षी दिवाळी सुरू होण्याआधी संपते, मात्र यंदा २५ ऑक्टोबरला पदवीच्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरू करण्याचा विचार आहे. त्यानंतर २६ आणि २७ ऑक्टोबरला परीक्षा होईल. २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात दिवाळी आल्याने केवळ सात दिवसांची सुट्टी असेल. त्यानंतर पुन्हा ४ नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहेत. यापैकी २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान तुलनेत कमी विद्यार्थी असलेल्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीत परीक्षांचे आयोजन होणार असले तरी ज्या विषयांना विद्यार्थी मोठय़ा संख्येने असतात, त्यांच्याच परीक्षा दिवाळीनंतरच होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांच्या नाराजीचे तसे काही कारण नाही, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण दीपक वसावे यांनी खुलासा करताना सांगितले.

मुळात अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याकरिता महाविद्यालयांना आखून दिलेल्या वर्षभराच्या वेळापत्रकानुसार साधारणपणे पहिले शैक्षणिक सत्र २५ ऑक्टोबरलाच संपते आहे. त्यानंतर परीक्षा होणार असतील तर शिक्षकांच्या दिवाळी सुट्टीचाही बोजवारा उडणार आहे. त्यामुळे याला शिक्षकांकडून जोरदार विरोध होईल, अशी प्रतिक्रिया एका प्राचार्यानी व्यक्त केली.

प्रथम वर्षांचाही गोंधळ

प्रथम वर्षांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा ४ ऑक्टोबर (एफवायबीकॉम), १७ ऑक्टोबर (एफवायबीए), १८ ऑक्टोबर (बॅफ, बीबीआय, बीएमएस), ५ ऑक्टोबरला (बीएससी, बीएससी-आयटी) सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. गेल्या वर्षीपर्यंत या परीक्षा महाविद्यालये त्यांच्या सोयीनुसार घेत होती. यंदा विद्यापीठाने प्रथम वर्षांच्या परीक्षांकरिता पहिल्यांदाच महाविद्यालयांना वेळापत्रक नेमून दिले आहे. आता या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही विद्यापीठच पाठविणार आहे. परंतु याच वर्षी गणेशोत्सवाकरिता पाच दिवसांची सुट्टी जाहीर झाल्याने अध्ययनाच्या दिवसांना कात्री लागली आहे. पहिल्या सत्रात किमान ९० दिवस अध्यापन होणे गरजेचे आहे. यंदा प्रथम वर्ष पदवीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनच्या घोळामुळे तुलनेत उशिराने सुरू झाली. परिणामी, वर्गही उशिराने सुरू झाले. या सगळ्यामुळे जेमतेम मिळणाऱ्या ५० दिवसांत केवळ ६०टक्के (जेमतेम ५० दिवस) इतकाच अभ्यासक्रम परीक्षेआधी महाविद्यालयांना पूर्ण करता येणार आहे. म्हणून परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.