मुंबई : भाजप आणि शिवसेनेने युतीचा निर्णय घेतल्याने राज्यात आता युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशा थेट लढती होणार आहेत. युतीतील मतदारसंघांच्या वाटपानुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये सर्वाधिक १७ मतदारसंघांत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत १२ मतदारसंघांमध्ये लढती अपेक्षित आहेत.

यंदा भाजप २५ तर शिवसेनेच्या वाटय़ाला २३ जागा येतील. शिवसेनेच्या वाटय़ाला येणारी एक अतिरिक्त जागा ही बहुधा पालघरची असेल, अशी शक्यता वर्तविली जाते. गत वेळी राज्यातील ४८ पैकी ४२ विक्रमी जागा युतीने जिंकल्या होत्या.

गेल्या वेळी भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक १७ मतदारसंघांमध्ये लढती झाल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये १२ मतदारसंघांमध्ये लढती झाल्या होत्या. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आठ मतदारसंघांमध्ये, तर भाजप आणि राष्ट्रवादीत सात मतदारसंघांमध्ये लढती झाल्या होत्या. यंदाही एखाद्-दुसरा अपवाद वगळता हेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते २५ ते २८ जागा मिळतील या आशेवर आहेत. २००९ मध्ये काँग्रेसला देशभर अनुकूल वातावरण असताना राज्यात काँग्रेस १९, तर राष्ट्रवादी नऊ अशा जागाजिंकल्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीतही युतीला २० जागांचा पल्ला पार करता आला होता.

यंदा एवढी वाईट परिस्थिती नाही. यामुळे युती २८ ते ३० जागांचा पल्ला सहज पार पडेल, असा विश्वास भाजपला आहे.

शिवसेना विरुद्ध काँग्रेस लढती झालेले मतदारसंघ

रामटेक, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, औरंगाबाद, मुंबई उत्तर-पश्चिम, दक्षिण मध्य मुंबई, शिर्डी, रत्नागिरी.

प्रतिकूल परिस्थितीतही २००९ मध्ये युतीला २० जागांचा पल्ला पार करता आला होता. यंदा एवढी वाईट परिस्थिती नाही. यामुळे युती २८ ते ३० जागांचा पल्ला सहज पार पडेल, असा विश्वास भाजपला आहे.

भाजप आणि काँग्रेसमध्ये लढती झालेले मतदारसंघ

नंदुरबार, धुळे, अकोला, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, सांगली.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत लढती झालेले मतदारसंघ

ठाणे, कल्याण, नाशिक, मावळ, शिरुर, परभणी, अमरावती, बुलढाणा, रायगड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढती झालेले मतदारसंघ

जळगाव, रावेर, भंडारा-गोंदिया, दिंडोरी, ईशान्य मुंबई, अहमदनगर, बीड.