वीज बिल भरण्यापासून ते कॉल सेंटरला तक्रार करण्यापर्यंतच्या महत्त्वपूर्ण सुविधा महावितरणने ग्राहकांसाठी मोबाइलवर उपलब्ध करुन दिल्या असून कंपनीच्या या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश गुप्ता उपस्थित होते.
ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी महावितरणकडून सातत्याने नवनवीन उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. यात ग्राहकांना त्यांचे वीज बिल बघता तसेच भरता येईल. मोबाइल अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगचा वापर करून वीजबिल भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
याशिवाय या अ‍ॅपमध्ये वीज सेवेबाबत तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना ग्राहक क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या तक्रारीची पोच ग्राहकांना तक्रार क्रमांकासह एसएमएस द्वारे मिळणार आहे. या अ‍ॅपद्वारे महावितरणच्या १८००-२३३-३४३५, आणि १८८-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करता येईल. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना महावितरणशी संबंधित सेवांची चौकशी करता येईल व त्याबाबत सूचनाही करता येईल. विशेष म्हणजे ग्राहकाने आपल्या मोबाईल क्रमांकावरून एकदा या अ‍ॅपवर नोंदणी केल्यास या ग्राहकाला परत नव्याने नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. महावितरणच्य http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावरुन तसेच गुगल प्लेवरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.