बेपत्ता मृतदेह प्रकरणात राजावाडी रुग्णालयातील शव कक्ष परिचर आणि आरोग्य अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. महापालिका प्रशासनाने याप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. पोलीस कारवाई समितीच्या अहवालावर अवलंबून असेल, असे सांगण्यात आले.

गोवंडी परिसरात राहणाऱ्या मेहराज शेख (२३) याची हत्या झाली होती. याप्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मेहराजचा मृतदेह शवचिकित्सेसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. शवचिकित्सेपूर्वी मृतदेहाची करोना चाचणी केली गेली. ७ मे रोजी चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यात मेहराज करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. अहवाल आल्यानंतर पोलीस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शवागारात गेले तेव्हा मेहराजचा मृतदेह तेथे नव्हता. पोलिसांनी तेव्हापासूनच या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. तर सोमवारी रात्री उशिरा याप्रकरणी शवागारात घुसखोरी करून पुरावा नष्ट करणे या कलमान्वये परिचर, आरोग्य अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. महापालिके ने प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून पाच दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.