News Flash

Coronavirus : लॉकडाउनमध्ये वाढदिवसाची पार्टी करणे भाजपा नगरसेवकास भोवले

पनवेल शहर पोलिसांकडून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल

करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाउनची व संचारबंदीची घोषणा केलेली असतान मित्रांना घरी बोलावून वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवक व इतर दहा जणांवर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.

पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० – क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नगरसेवक बहिरा हे त्यांच्या तक्का येथील घरातील छतावर गावातील दहा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत होते. नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका जागरुक नागरिकाने याबाबत माहिती दिल्यावर शुक्रवारी रात्री 12 वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्यासह पथक नगरसेवक बहिरा यांच्या घरी दाखल झाले असता, त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले दहा मित्र व नगरसेवक बहिरा आढळून आले. तेथील दारुची बाटलीही पोलीसांनी जप्त केली.

याप्रकरणी तातडीने नगरसेवक बहिरा व अन्य दहा जणांविरोधात संसर्ग साथ नियंत्रणात निष्काळजी वर्तन केले म्हणून आणि संचारबंदीत चारपेक्षा अधिक जण जमवले म्हणून गुन्हे नोंदविले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नगरसेवक बहिरा यांनी कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी परिसरात भाजपतर्फे मास्क वाटप केले होते. तसेच, पनवेलमध्ये शुक्रवारी एका ३३ वर्षीय तरुण रिक्षाचालकाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर काही तासांतच नगरसेवकाने केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 11:09 am

Web Title: filed crime against bjp corporator who had celebrate birthday party msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रुग्णालयांनी प्रवेश नाकारल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
2 समाजमाध्यम वापरावर पोलिसांचे निर्बंध
3 मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांना खबरदारीची गरज
Just Now!
X