सचिन धानजी

अतिरिक्त आयुक्तांनी राणीबागेतील निवासस्थान सोडले

मुंबईच्या महापौरांसाठी पर्यायी निवासस्थान म्हणून निवड झालेली भायखळ्याच्या राणीबागेतील वास्तू अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी अखेर बुधवारी रिकामी करून महापालिका प्रशासनाच्या स्वाधीन केली. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानाचा मार्ग खुला झाला आहे. रंगरंगोटी व दुरुस्तीनंतर जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात महापौर तिथे राहण्यास जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिवाजीपार्क येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्याने हे निवासस्थान महापौरांना सोडावे लागणार आहे. शिवाजीपार्क येथील महापौर निवासाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून ती जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला देण्यात आली आहे. स्मारकाचा आराखडा तयार करून त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. २३ जानेवारीला अर्थात बाळासाहेबांच्या जन्मदिनी या नूतनीकरणाचा नारळ वाढवला जाणार आहे. त्यामुळे महापौरांचे पुनर्वसन राणीबागेतील निवासस्थानात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

राणीबागेतील या बंगल्यात पालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड राहत होते. मधल्या काळात ते मध्य प्रदेशमधील निवडणूक कामासाठी गेले होते. ५ डिसेंबपर्यंत निवासस्थान रिकामे करून दिले जाईल असे आश्वासन त्यांनी महापौर निवासस्थानातच उद्धव ठाकरे यांच्यासमवेत प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत दिले होते. गुरुवारी आबासाहेब जऱ्हाड यांनी राणीबागेतील निवासस्थान रिकामे करून प्रशासनाच्या ताब्यात दिले. जऱ्हाड यांनी आता वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी मुक्काम हलवल्याचेही समजते. रंगरंगोटीसाठी २० ते २५ दिवस लागतील. जानेवारीच्या पहिल्या पंधरवडय़ात महापौरांना आपला मुक्काम राणीबागेतील पर्यायी निवासात हलवावा लागणार आहे.