उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाला दिले. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रस्तावही तातडीने पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठातील सोयी-सुविधा आणि अडचणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर आणि संबंधित प्राध्यापक उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच विद्यापीठाने शासनाशी समन्वय ठेवावा, शासन विद्यापीठांचा विकास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल, असे सामंत म्हणाले.

मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरू होऊ  शकते, त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोकण विभागात पर्यटन, मत्स्यव्यवसाय, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, फलोत्पादन यांसारख्या रोजगाराच्या मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध असलेल्या विषयांचे विद्यापीठांनी अभ्यासक्रम तयार करावेत, त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ  नये यासाठी विद्यापीठाने बिंदू नामावली तपासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले.