आजचा भारतीय चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. याआधी आपण भारतातील गरिबी, लाचारी यांचे चित्रण असलेले चित्रपट पाहिले. पण आताच्या चित्रपटांमध्ये समस्यांबरोबर त्यावरील उत्तरही दाखवले जाते. ही चांगली गोष्ट आहे. आपल्या भारतीयत्वाची ओळख चित्रपटांतून होते. जगभर आता भारतीय चित्रपटांचा चाहता वर्ग आहे. आपला देश बदलत आहे. त्याचबरोबर तो आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही शोधतो आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पेडर रोर्ड  येथील देशातील पहिल्या चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

शताब्दी गाठणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास दाखवणारे आजवर एकही संग्रहालय भारतात नव्हते. परंतु मुंबईच्या पेडर रोड येथील गुलशन महलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे पहिले संग्रहालय आता सिनेरसिकांसाठी खुले झाले आहे. जर्मनीतील चित्रपट संग्रहालय जगात प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर भारतातही संग्रहालय सुरू करावे, अशी योजना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी आखली होती. त्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. तसेच मुंबईतील फिल्म डिव्हिजनच्या आवारातील गुलशन महाल इमारतीची यासाठी निवड करण्यात आली होती. त्यामुळे १५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत आता भारताचा यशस्वी सिनेप्रवास उलगडण्यात आला आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गुलशन महलमध्ये चित्रपटांचा १०० वर्षांचा इतिहास पाहायला मिळणार आहे.