७० ते ८०च्या दशकात बालिवूडमध्ये हॉरर चित्रपटांचं स्थान निर्माण करून चित्रपटगृहात प्रेक्षकांना धडकी भरवणारे दिग्दर्शक श्याम रामसे यांचे निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते. बुधवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम रामसे यांचे पुतणे अमित रामसे यांनी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली.

श्याम रामसे हे काही दिवसांपासून न्युमोनियाच्या व्याधीने त्रस्त होते. त्यांना मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले, असे अमित रामसे यांनी सांगितले.

भयपटांचे गारूडी अशी रामसे बंधूंची ओळख होती. त्यापैकी श्याम रामसे एक होते. ७० आणि ८०च्या दशकात भारतीय सिनेरसिकांना घांबरगुंडी उडवणाऱ्या भयपटाचा अनुभव रामसे बंधूनी दिला. दूरदर्शनच्या आगमनानंतर पहिल्यांदा रामसे बंधूनी भूत, आत्मा या गोष्टी पडद्यावर आणल्या. यात श्याम रामसे यांचेही मोठं योगदान आहे. त्यांनी ७०च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत हॉरर सिनेमा आणला. श्याम रामसे यांनी अंधेरा (१९७५), सबूत (१९८०), पुराना मंदिर (१९८४), पुरानी हवेली (१९८०), कोई है (२०१७), वीराना, बंद दरवाजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

श्याम यांनी त्यांचे बंधू तुलसी रामसे यांच्यासोबतीने भारतीय दूरचित्र वाहिन्यांवर हॉरर शैलीच्या मालिका आणल्या. १९९३ ते २००१ पर्यंत चाललेली झी हॉरर शो ही त्यांनी भारतीय वाहिन्यांवर आणलेली पहिली मालिका ठरली. श्याम रामसे हे त्यांच्या दोन मुली साशा आणि नम्रता यांच्यासह राहत होते. गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये त्यांचे बंधू तुलसी रामसे यांचे निधन झाले आहे.