‘व्हिवा लाउंज’मध्ये पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर यांचे मत
भारतीय प्रेक्षकांना चित्रपटाच्या बाबतीत केवळ ‘काळे आणि पांढरे’ एवढेच कळते. त्याच्या पलिकडे जाऊन इतरही रंग चित्रपटात किंवा एकंदरीतच आयुष्यात असतात, हे त्यांना पटकन कळत नाही. त्यामुळे चित्रपट हा सुखान्ती किंवा दुखान्ती असावा, हीच त्यांची अपेक्षा असते. परिणामी वेगळाच शेवट करणारे चित्रपट मार खातात. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी केवळ ‘काळे आणि पांढरे’ या फंदात न अडकता चित्रपटाच्या बाबतीत जास्त साक्षर होण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर यांनी ‘व्हिवा लाउंज’मध्ये व्यक्त केले. रवींद्र नाटय़ मंदिरच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये बुधवारी झालेल्या या ‘लाउंज’ला पटकथा लेखन व चित्रपट विषयात रूची असलेल्या अनेक तरुणांनी गर्दी केली होती.
‘शांघाय’, ‘आय एम’ अशा हटके चित्रपटांची पटकथा लिहिणाऱ्या ऊर्मी जुवेकर यांनी पटकथा आणि कथा यांच्यातील मूलभूत फरक, चित्रपट या चित्रांच्या माध्यमाच्या मर्यादा आणि बलस्थाने, चित्रपट हा व्यवसाय की कला, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्यातील ताळमेळ अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. चित्रपट हा कला आणि धंदा याचे मिश्रण असून हे माध्यम हाताळताना या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधावा लागतो. पटकथा लिहिताना याचा फार गंभीरपणे विचार होणे गरजेचे असते, असेही त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे प्रेक्षकांमधून आलेल्या सर्वच प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
एखाद्या कथेची पटकथा करताना त्या कथेतील काळ लक्षात घ्यावा लागतो. चित्रपटात केवळ एकच काळ मांडता येतो तो म्हणजे ‘आत्ता’! ‘फ्लॅशबॅक’ वगैरे दाखवतानाही प्रेक्षकांना तो ‘आत्ता’च दिसत असतो. त्यामुळे या काळाची मर्यादा पटकथा लिहिताना पाळावी लागते, असे सांगत त्यांनी पटकथा आणि कथा यांतील फरक स्पष्ट केला. त्याचबरोबर चित्रपट बनवणे ही सांघिक कामगिरी असल्याने प्रत्येकाचेच काम जबाबदारीचे असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोणताही चित्रपट हा ‘स्टार व्हॅल्यू’वर चालतो. त्यामुळे निश्चितच आपल्याकडे कलाकारांना जास्त मानधन मिळते. मात्र पटकथा लेखकांना मिळणारे मानधन कमी नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.    
सविस्तर वृत्त ४ जानेवारी २०१३ च्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये