18 February 2020

News Flash

‘माय मराठी’ अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात

जर्मन विभागप्रमुख डॉ. विभा सुराणा यांनी २०१२ साली ‘माय मराठी’ प्रकल्प सुरू केला

(संग्रहित छायाचित्र)

नमिता धुरी

अमराठींसाठी पूर्णवेळ अभ्यासक्रम; शेवटच्या पातळीच्या लिखाणाचे काम सुरू

अमराठी विशेषत: परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शिक्षण देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने हाती घेतलेला ‘माय मराठी प्रकल्प’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. युरोपीय पद्धतीने मराठी भाषेचे अध्यापन करण्यासाठी विविध पातळ्यांमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. त्याच्या सहाव्या म्हणजेच शेवटच्या पातळीच्या लिखाणाचे काम सुरू झाले आहे.

जर्मन विभागप्रमुख डॉ. विभा सुराणा यांनी २०१२ साली ‘माय मराठी’ प्रकल्प सुरू केला. अमराठी भाषिकांसाठी असलेला हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. आतापर्यंत याच्या पाच पातळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक पातळी १२० तासांची असून त्यात १० मुद्दे शिकवले जातात. प्रत्येक मुद्दय़ाचे अध्यापन व्याकरण, संभाषण कौशल्य, शब्दसंपदा, व्यक्तिपरिचय अशा चार भागांमध्ये केले जाते. सीडीसहित पाठय़पुस्तक, सराव चाचणी आणि उत्तरसंच असणारे अभ्यासपुस्तक, मराठी-इंग्रजी आणि हिंदी शब्दसंग्रह अशी अभ्याससामग्री तयार करण्यात आली आहे.

२०१४ साली या अभ्यासक्रमाच्या पहिल्या पातळीचे अध्यापन विद्यापीठात सुरू झाले. पाच पातळ्या पूर्ण झाल्यानंतर आता शेवटच्या, सहाव्या पातळीचे काम सुरू झाले असून तेही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती डॉ. सुराणा यांनी दिली.

‘मराठी ही संपन्न पूर्वपरंपरा असलेली इंडो-युरोपियन भाषा आहे, मात्र अन्य भाषकांसाठी मराठी भाषेची जी पुस्तके २०१४च्या आधी उपलब्ध होती, ती पारंपरिक पद्धतीने प्राथमिक स्तरावरचे भाषाशिक्षण देत होती.

शिवाय मराठीच्या अध्ययनासाठी पुरेशी शिक्षणसामग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे या पूर्णवेळ अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे,’ असे  डॉ. सुराणा यांनी सांगितले.

पातळीनिहाय अभ्यासक्रम

* अभ्यासक्रमाच्या पहिल्या पातळीमध्ये अमराठी पर्यटकांना स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेले प्रश्न, संख्या, चव, अर्ज भरणे, रंग, महिने, पशु-पक्षी, इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.

* दुसऱ्या पातळीमध्ये प्रसारमाध्यमे, आवडनिवड, नातेसंबंध, डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संवाद, सणांविषयी बोलणे, पाककृती बनवणे, पर्यटन, भाषा यांविषयी बोलणे, भ्रमंती इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

* तिसऱ्या पातळीमध्ये व्यक्तींविषयी बोलणे, स्त्री-पुरुष नातेसंबंध, विविध व्यवसाय, प्रशासकीय भाषा, पर्यावरण, जागतिकीकरण, बहुसांस्कृतिकता, बोलीभाषा, शासकीय व स्वयंसेवी संस्था, सामाजिक समस्या, शहरी-ग्रामीण जीवन अशा विषयांचे ज्ञान दिले जाते.

* चौथ्या पातळीमध्ये कलाविश्वातील घडामोडी, चित्रपट परीक्षणे लिहिणे, महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था, शिक्षणाचे माध्यम, त्यातील प्रयोगशीलता यांची ओळख करून दिली जाते.

* पाचव्या पातळीमध्ये महाराष्ट्रातील साहित्य, राजकारण, खेळ, आरोग्य, समारंभ, पोशाख अशा सर्व क्षेत्रांशी निगडित माहिती दिली जाते.

First Published on January 17, 2020 1:03 am

Web Title: final phase of my marathi course abn 97
Next Stories
1 विरार-अलिबाग कॉरिडॉरला प्राधान्य
2 मुंबई मॅरेथॉनमध्ये महिलांची संख्या वाढली
3 काँग्रेसच्या नाराजीनंतर संजय राऊत यांची माघार
Just Now!
X