भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबईतील CSMT स्थानकावर पोलिसांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाण्यापासून रोखलं होतं. रेल्वेस्थानकावर पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा देखील होता व किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेराव देखील दिला होता. तर, सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांना तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणत कोल्हापूरला आपण जाणारचं असं सांगितलं. यानंतर बराचवेळ सोमय्या हे पोलिसांचा गराड्यातच अडकले होते. मात्र, तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही, असं म्हणत सोमय्या रेल्वेत बसले व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. मात्र, कोल्हापूरच्या अगोदर येणाऱ्या जयसिंगपूर या रेल्वेस्थानकावर त्यांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

यावेळी सोमय्यांसोबत माध्यम प्रतिनिधी देखील मोठ्याप्रमाणावर होते. पोलिसांची दादागिरी सुरू असल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत. सोमय्या यांनी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत, ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

”मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही, मुख्यमंत्री व शरद पवार यांचं हे कारस्थान आहे. मात्र, हसन मुश्रीफचा घोटाळा मी उघड करणारचं. चार तास मला घरात कोंडून ठेवलं याचं उत्तर मुख्यमंत्री व गृहमंत्री देणार का?” असं देखील सोमय्या म्हणाले आहेत.