14 December 2019

News Flash

‘न्याय मिळवून द्या’, पीएमसी बँक खातेधारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव

सीतारामन यांना पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

पीएमसी बँकेच्या खातेधारकांकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घालण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर बँकेच्या खातेधारकांनी आपला रोष व्यक्त केला. तसंच अर्थमंत्र्यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खातेधारकांकडून करण्यात आली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी मुंबईतील भाजपा कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यापूर्वी त्यांना पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या खातेधारकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्या भाजपा कार्यालयात प्रवेश करत असताना पीएमसी बँकेच्या काही खातेधारकांनी त्यांना घेराव घातला आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली. बँकेने आमचे पैसे परत करावे. ज्या लोकांनी हा घोटाळा केला त्यांना शिक्षा द्यावी. परंतु आमचा दोष नसतानाही आम्हाला याची शिक्षा मिळत आहे. आमच्या मेहनतीचे पैसे आम्ही या बँकेत विश्वासाने ठेवले होते. परंतु आता आम्हाला पैसे काढता येत नाहीत. आम्ही बँकांवर विश्वास ठेवून आमचे पैसे ठेवत असतो. अनेकांना राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांमधला फरकही माहित नसतो. तो सर्वांना समजला पाहिजे. आमचे पैसे परत मिळावे हीच आमची इच्छा असल्याचं काही खातेधारकांनी बोलताना सांगितलं.

दरम्यान, खातेधारकांचं म्हणणं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यापर्यंत पोहोचवू असं आश्वासन निर्मला सीतारामन यांनी बोलताना दिलं.

काय आहे प्रकरण?

पीएमसी बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावाधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसताना ही माहिती आरबीआयपासून लपवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. या सगळ्यामुळे ४३३५ कोटी रुपयांचा तोटा बँकेला झाला.  याच पैशांमधून हा गैरव्यवहार झाला. हा सगळा गैरव्यवहार हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीच्या पुढाकारातून झाला. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी केला.

यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा घोटाळा उघड झाला. याप्रकरणी आत्तापर्यंत १० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (निलंबित) जॉय थॉमस यांनाही अटक करण्यात आली.

First Published on October 10, 2019 1:48 pm

Web Title: finance minister nirmala sitharaman bjp office at mumbai depositors of pmc bank protesting outside the party office jud 87
Just Now!
X