राज्याच्या अर्थसंकल्पात चिन्हांकित केलेली तरतूद त्याच विभागासाठी खर्च करण्याचे निश्चित केले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. पुढील आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुनगंटीवार यांनी वेगवेगळ्या विभागासाठी निधी चिन्हांकित केला आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणात चिन्हांकित या शब्दांचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्यांच्या या शब्दांचा नक्की अर्थ काय, यावरून विरोधकांनी त्यांना प्रश्न विचारले होते. अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या शब्दांचा अर्थ त्यांना विचारला होता. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवर म्हणाले, अर्थसंकल्पामध्ये पूर्वी प्रत्येक विभागासाठी नियतव्यय प्रस्तावित केला जात होता. मात्र, प्रस्तावित केलेला निधी त्याच विभागासाठी खर्च केला जात नव्हता. हा निधी दुसऱया विभागासाठी वळविला जात होता. माझ्या अर्थसंकल्पात मी प्रत्येक विभागासाठी निधी चिन्हांकित केला आहे. त्यामुळे तो निधी त्याच विभागासाठी वापरला जाणार आहे. कोणत्याही स्थितीत हा निधी इतर विभागांकडे वळविला जाणार नाही.
चिन्हांकित या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी भुजबळ आणि विखे-पाटील यांनी बाजारातून डिक्शनरी विकत घेतली असती, तरी चालले असते. त्यांना डिक्शनरीतूनही या शब्दाचा अर्थ समजला असता. त्यासाठी सभागृहात हा प्रश्न उपस्थित करण्याची गरज नव्हती, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.