|| मानसी जोशी

जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण

 

मुंबई : करोना, टाळेबंदीमुळे मार्चपासून मॅरेथॉनसारख्या विविध क्रीडास्पर्धा रद्द झाल्याने या स्पर्धांवर आधारलेले अर्थकारणही कोलमडले आहे. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी क्रीडास्पर्धा जूनपर्यंत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे खास क्रीडास्पर्धांकरिता घेतले जाणारे कपडे, शूज, बक्षीसे तसेच इतर सुविधा पुरवणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यांना जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही जड जात आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यापासून देशभरात विविध ठिकाणी मॅरेथॉन आयोजित केल्या जातात. त्यापैकी महाराष्ट्रात ‘टाटा मुंबई’, ‘ठाणे’, ‘वसई विरार’, ‘नवी मुंबई’, ‘हिरानंदानी’, ‘पुणे’, ‘सातारा हिल’ या महत्त्वाच्या मॅरेथॉन मानल्या जातात. या क्रीडास्पर्धांवर मोठे अर्थचक्र अवलंबून असते. टाळेबंदीमुळे महत्त्वाच्या क्रीडास्पर्धा रद्द झाल्या. त्यामुळे या स्पर्धांकरिता घेतले जाणारे कपडे, शूज, एनर्जी ड्रिंक, आरोग्य सुविधा, बक्षिसे यांचीही मागणी रोडावली. काही ठिकाणी आभासी (व्हच्र्युअल) मॅरेथॉनचे प्रयोग झाले. मात्र, यातून आयोजकांचा आयोजनाचा खर्चही निघत नाही. तसेच प्रतिसादही फारसा नाही. ‘मॅरेथॉन रद्द झाल्याने अनेक आयोजकांनी स्पर्धकांचे शुल्क परत दिले. त्यामुळे आयोजकांनी आमच्याकडील शर्टांची नोंदणी रद्द केली. अजूनही काही आयोजकांचे पैसे येणे बाकी आहे. सात महिन्यांपासून व्यवसाय थंडावल्याने जागेचे भाडे तसेच कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास अडचणी येत आहे,’ असे ‘टेकिडो स्पोर्टंस’च्या प्रीती भंडारी यांनी सांगितले.

लवकुमार झा हे मुंबईतील विविध कंपन्यांच्या उत्पादनाचे वितरक आहेत. दरवर्षी विविध स्पर्धांच्या निमित्ताने ते मुंबई पोलीस, प्रो कबड्डी, महापालिका तसेच विविध मॅरेथॉनना शूज पुरवतात. ‘यंदा महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाच नसल्याने पन्नास लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. पुढील वर्षी या क्रीडास्पर्धा कधी होणार याची शाश्वती नसल्याने ग्राहकांकडून मागणी नाही. काहींनी आगाऊ नोंदणी रद्द केली आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘मॅरेथॉन अथवा कोणतीही धावण्याची मोठी स्पर्धा असल्यास धावपटू एक ते दोन महिने आधी सरावाकरिता शूज खरेदी करतात. करोनामुळे चार ते पाच महिने मॉल बंद असल्याने नवीन शूज तसेच पडून  आहेत. सध्या ३० टक्के ही व्यवसाय नाही. अनेक ग्राहक भीतीपोटी संकेतस्थळांवर शूज खरेदी करत आहेत,’ असे ठाण्यातील ‘अ‍ॅसिक्स’च्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले.

पर्यटनावरही परिणाम

स्पर्धांमुळे पर्यटनासही चालना मिळते. स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळतो. करोनामुळे पुण्यातील ‘रनबडीज’ कंपनीने आयोजित केलेल्या २६ मॅरेथॉन रद्द कराव्या लागल्या. कंपनीचे प्रमुख अरविंद बिजवे यांनी सांगितले की, ‘कोची’, ‘माथेरान’, खोपोलीजवळ ‘दूरशेत’ या ठिकाणी आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. मात्र स्पर्धाच रद्द झाल्याने हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना पैसे देणे कठीण झाले आहे. पुढील महिन्यातील परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.