मानसी जोशी

राज्यातील ग्रामीण जनतेला चित्रपट दाखविणाऱ्या फिरत्या चित्रपटगृहांवरही टाळेबंदीमुळे आर्थिक कु ऱ्हाड कोसळली आहे. मार्चपासून यात्राच बंद झाल्याने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील तंबू मालक आणि त्यावर उपजीविका असलेल्या एक हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी टुरिंग टॉकीज (फिरते चित्रपटगृह) हे मनोरंजनाचे मुख्य साधन आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात जत्रा, यात्रांमध्ये ही चित्रपटगृहे लागतात. बुलढाणा, वाशिम, जालना येथे नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांत जवळजवळ १०८ यात्रा भरतात. त्यापैकी ‘देऊळगावचा राजा’, ‘बालाजी महाराज’, वाशिम येथे भरणारी ‘लोणी सखाराम महाराज’, ‘मंगरूळपीर’ आणि ‘काळामाता’ यात्रा, बुलढाणा येथील ‘सैलाणी’ यात्रा, जळगाव येथील ‘शेंगोळा’, जालन्याची ‘नळणी’ आणि ‘मोठा महादेव’ या मोठय़ा यात्रांमध्ये तंबू मालकांची भरघोस कमाई होते. या फिरत्या चित्रपटगृहात एका वेळेस सहाशे प्रेक्षक चित्रपट पाहण्याचा आनंद लुटतात. आधुनिक तंत्रज्ञान, गावोगावी मल्टिप्लेक्स आणि एकपडदा चित्रपटांगृहांचे वाढते प्रमाण या कारणांमुळे वीस वर्षांपूर्वी १३००च्या आसपास असलेल्या या चित्रपटगृहांची संख्या आता अवघ्या ४७वर येऊन ठेपली आहे. टाळेबंदीमुळे यात्रा आणि उरुस स्थगित करण्यात आल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. विविध ठिकाणी असलेले १५ टुरिंग टॉकीज बंद झाले.

‘एका फिरत्या चित्रपटगृहांवर १० ते १५ कामगारांचे घर चालते. इतर खर्च, कामगारांचे वेतन वगळून ३० ते ४० हजार सहज मिळतात. मात्र यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा चार महिनेच व्यवसाय झाला. तीन महिन्यांतील १० यात्रांचे खेळ बंद झाले. यामुळे व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या एक हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे,’ असे चिखली येथील ‘सुमेध टुरिंग टॉकीज’चे प्रमुख महम्मद कासम नवरंगी यांनी सांगितले.

काही तंबू मालकांचे सामान अजूनही यात्रेच्या ठिकाणीच असल्याने त्यांचे पाऊस-वाऱ्यामुळेही प्रचंड नुकसान झाले आहे. टाळेबंदी सुरू झाल्याने हे सामान त्यांना हलवता आलेले  नाही. ‘यात्रा आल्या की व्यवसायाकरिता तंबू मालकांनी अद्ययावत उपकरणांसह नवीन प्रदर्शित चित्रपट दाखवण्यासाठी कर्जे काढून लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र हंगाम गेल्याने कर्जे फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे,’ असे  ‘महाराष्ट्र तंबू संघा’चे सचिव संजय धाडवे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आजही लोकप्रिय

शहरातून तंबूत चित्रपट पाहणे हद्दपार झाले असले तरीही अल्प दर, नवीन चित्रपटांचे प्रदर्शन ग्रामीण भागात टुरिंग टॉकीज आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. हिंदी, मराठी आणि डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट लोकप्रिय आहेत. स्पर्धेत टिकण्यासाठी या चित्रपटगृहांनीही अद्ययावत तंत्रज्ञानामुळे नवे रूप धारण केले आहे. सध्या फिरत्या चित्रपटगृहात ‘केसेरा सेरा’, ‘यूएफओ’, ‘इंटव्‍‌र्हल’, ‘क्यूक’ या कंपनीचे सव्‍‌र्हर लावले जातात.

२८ दिवसांच्या परवान्यावर मुंबईतील नवीन प्रदर्शित चित्रपट तंबूत दाखवले जातात. ३० रुपये एवढे नाममात्र शुल्क आकारले जाते. सायंकाळी चार आणि रात्रीचे दोन असे एकूण सहा खेळ आयोजित के ले जातात. एका प्रयोगाला ३०० ते ४०० प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देऊळगावचा राजा येथील आनंद टुरिंग टॉकीजचे प्रमुख नीरज कांबळे ‘लोकसत्ता’ला दिली.

मुख्यमंत्र्यांना मदतीचे साकडे

नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या पुढच्या हंगामात यात्रा सुरू झाल्या तरी करोनाच्या धास्तीपायी किती गावकरी तंबूत चित्रपट पाहण्यास येतील, हा प्रश्न आहे. प्रेक्षकांना काही अंतर सोडून बसविण्याचे बंधन असेल. वारंवार  निर्जंतुकीकरण करावे लागले. यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे.

– विजय कुलकर्णी, विजय टुरिंग टॉकीजचे मालक, सातारा